देशात गेल्या २४ तासांत १९७५ नवे रुग्ण; कोरोनाबाधितांची संख्या २६ हजारांवर
देशात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे
नवी दिल्ली : देशात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या 24 तासांत देशात 1975 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 47 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता देशात एकूण कोरोनाबाधितांची संख्या 26 हजार 917 इतकी झाली आहे. देशात आतापर्यंत 5 हजार 914 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 826 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती, केंद्रीय आरोग्य मंत्रायाकडून देण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 15 एप्रिलपासून लॉकडाऊन 2.0 घोषित केला. त्यानंतर पुढील 10 दिवसांत कोरोना संसर्गाच्या प्रकरणात दुपटीने वाढ झाली. 15 एप्रिल रोजी संसर्गग्रस्तांची संख्या जवळपास 12 हजारहून अधिक होती. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्रीपर्यंत कोरोनाबाधितांचा आकडा दुपटीने वाढला असून तो 26 हजारांवर गेला आहे.
देशात कोरोना संसर्गाची 65 टक्के प्रकरणं ही केवळ देशातील 5 राज्यांमधील आहेत. देशातील 78 टक्के मृत्यूदेखील याच 5 राज्यांमध्ये झाले आहेत. COVID19India.org वेबसाईटनुसार, कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रात आतापर्यंत कोरोनाचे 7628 रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी 323 लोकांचा मृत्यू झाला आहे.
कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत गुजरात दुसऱ्या क्रमांकावर आहे. गुजरातमध्ये 3171 रुग्ण आढळले आहेत. तर 133 लोकांचा मृत्यू झाला आहे.
दिल्ली तिसऱ्या क्रमांकावर असून 2625 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 54 लोक दगावले आहेत.
त्याखालोखाल, मध्यप्रदेश 2036 कोरोनाबाधित, 99 मृत्यू
तमिळनाडू 1821 संसर्गग्रस्त, 23 मृत्यू आणि
उत्तरप्रदेश 1793 कोरोनाग्रस्त असून 27 जणांचा मृत्यू झाला आहे.