उन्नाव बलात्कार प्रकरण: आमदार कुलदीप सेंगरला जन्मठेप
दिल्लीच्या तीस हजारी न्यायालयाने १६ डिसेंबरला कुलदीप सेंगर दोषी असल्याचा निकाल दिला होता.
नवी दिल्ली: २०१७ सालच्या उन्नाव बलात्कार प्रकरणातील दोषी कुलदीप सेंगरला शुक्रवारी न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. दिल्लीच्या तीस हजारी न्यायालयाने १६ डिसेंबरला कुलदीप सेंगर दोषी असल्याचा निकाल दिला होता. मात्र, न्यायालयाने शिक्षेचा निकाल राखून ठेवला होता. अखेर आजच्या सुनावणीत न्यायालयाने सेंगरला जन्मठेप आणि २५ लाख रुपयांचा दंड ठोठावला.
सुरुवातीला हा खटला लखनऊमध्ये चालवण्यात येत होता. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर हा खटला दिल्लीत वर्ग करण्यात आला होता. या प्रकरणाची सुनावणी ४५ दिवसांत पूर्ण करण्याचे आदेशही सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. त्यानुसार ५ ऑगस्टपासून या खटल्याची दैनंदिन सुनावणी सुरु झाली होती. गेल्या आठवड्यात या खटल्यातील युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे न्यायाधीश धर्मेश शर्मा निकाल राखून ठेवला होता.
उन्नाव बलात्कार - हत्या : तिची चूक एवढीच की, तिनं भाजप आमदारावर बलात्काराचा आरोप केला...
उत्तर प्रदेशमधील बांगरमऊ विधानसभा मतदारसंघातून सेंगर चौथ्यांदा आमदार म्हणून निवडून आला होता. कुलदीप सेंगरने २०१७ मध्ये एका युवतीचे अपहरण केल्यानंतर कुलदीप सेंगरने पीडितेने बलात्कार केला होता. गेल्यावर्षी एप्रिल महिन्यात पोलिसांनी त्याला अटक केली होती. बलात्काराचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर भाजपने सेंगरला पक्षातून निलंबित केले होते. या संपूर्ण प्रकरणात पाच खटले दाखल करण्यात आले होते. पीडितेच्या वडिलांचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला होता. यानंतर पीडित युवतीच्या कारला २८ जुलै रोजी एका ट्रकने जोरदार धडक दिली होती. या अपघातात पीडित युवती गंभीर जखमी झाली होती. या अपघातानंतर पीडितेच्या कुटुंबीयांनी या अपघातामागे सेंगरचा कट असल्याचा आरोप केला होता. सुप्रीम कोर्टाने उन्नाव बलात्कार प्रकरणी दाखल सर्व पाच प्रकरणे लखनऊ कोर्टातून दिल्लीतील कोर्टात वर्ग केली होते.