लखनऊ : उन्नाव बलात्कार प्रकरणात उत्तर प्रदेश पोलिसांनी सोमवारी भाजपाचे आमदार कुलदीप सिंह सेंगर यांच्यासहीत १० जणांवर हत्येचा आरोप ठेवत एफआयआर नोंदवली आहे. दुसरीकडे लखनऊच्या केजीएमयू ट्रॉमा सेंटरमध्ये पीडित तरुणी आणि तिचे वकील दोघेही व्हेंटिलेटरवर असून शेवटच्या घटका मोजत आहेत. या दोघांची परिस्थिती अत्यंत नाजूक अवस्थेत आहे. पीडितेच्या डोक्यावर गंभीर जखमा झाल्यात तर पायाचंही हाड तुटलेलं आहे. ट्रॉमा सेंटरचे प्रवक्ते संदीप तिवारी यांनी ही माहिती दिली.
रायबरेलीतच्या अतरेली गावानजिक रविवारी झालेल्या अपघातात उन्नाव बलात्कार पीडितेच्या गाडीचा गंभीर अपघात झाला. या अपघातावेळी गाडीत पीडित तरुणीसोबत तिची मावशी, काकी आणि वकिलही होते. मावशी आणि काकीचा जागीच मृत्यू झाला. ही घटना घडली तेव्हा पीडित तरुणीसोबत तैनात करण्यात आलेला कोणताही सुरक्षा अधिकारी नव्हता.
उन्नाव बलात्कार प्रकरणात भाजपाचे आमदार कुलदीप सिंह सेंगर आरोपी आहेत. बलात्कारानंतर आता त्यांच्यावर हत्येचाही आरोप करण्यात आलाय. पोलिसांकडून कुलदीप सिंह सेंगर, मनोज सिंह सेंगर, विनोद मिश्र, हरिपाल मिश्र, नवीन सिंह, कोमल सिंह, अरुण सिंह, ज्ञानेंद्र सिंह आणि रिंकू सिंह यांच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करत एफआयआर नोंदवण्यात आलीय. या सर्वांविरोधात आयपीसी कलम ३०२, ३०७, ५०६, १२० बी कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय. पीडितेच्या काकांकडून हा गुन्हा दाखल केला गेलाय.
एखाद्या बॉलिवूड सिनेमाची कथा असू शकेल असा घटनाक्रम उन्नाव बलात्कार आणि हत्या प्रकरण समोर आल्यानंतर या प्रकरणात दिसून आला. केवळ १७ वर्षांची एक अल्पवयीन मुलगी सत्ताधारी पक्षाच्या एका नेत्यावर बलात्काराचा आरोप करते... त्यानंतर ती गायब होते. प्रकरणात काहीही कारवाई न झाल्यानं ती मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या घरासमोर आत्मदहनाचा प्रयत्न करते. त्यानंतर नेत्याच्या भावाकडून मुलीच्या वडिलांना मारहाण होते. पोलिसांकडून गुन्हा दाखल होतो मात्र नेत्याच्या भावावर नाही तर मुलीच्या वडिलांवर... त्यानंतर वडिलांचा मृत्यू होतो... साक्षीदाराचाही संशयितरित्या मृत्यू होतो... त्यानंतर खुद्द पीडितेचा अपघात घडवून आणण्यात येतो...
४ जून २०१७ : उन्नावची रहिवासी असलेली एक अल्पवयीन मुलीनं भाजप आमदार कुलदीप सिंह सेंगर यांच्यावर बलात्काराचा आरोप केला. आपल्या एका नातेवाईकासोबत नोकरी मागण्यासाठी गेली असताना आमदारानं त्याच्या घरी आपल्यावर बलात्कार केल्याचं तिनं म्हटलं.
११ जून २०१७ : पीडिता अचानक नाहिशी झाली
१२ जून २०१७ : पीडितेच्या आईकडून पीडिता नाहिशी झाल्याची तक्रार नोंदवण्यात आली
२० जून २०१७ : हरवल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर जवळपास आठ दिवसांनी उत्तर प्रदेशातील ओरय्याच्या एका गावात पोलिसांना पीडित मुलगी सापडली. तिला उन्नावला आणण्यात आलं.
२२ जून २०१७ : पोलिसांनी पीडितेला कोर्टासमोर हजर केलं. यावेळी १६४ CRPC नुसार, पीडितेचा जबाब नोंदवण्यात आला. ४ जून २०१७ रोजी घडलेल्या घटनेचा उल्लेख करताना तिनं आमदाराचं नाव घेणं टाळलं. (काही दिवसांनी पोलिसांनी आमदाराचं नाव न घेण्यासाठी दबाव
केल्याचा आरोप तरुणीनं केला)
३० जून २०१७ : पीडित तरुणीला कुटुंबीयांकडे सोपवण्यात आलं. परंतु, यावेळी पीडितेच्या काकांकडून, पोलिसांनी पीडितेवर अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला. तिच्या काकांच्या म्हणण्यानुसार, पोलीस ३० जून २०१७ रोजी दिल्लीला घेऊन गेले होते.
१ ऑगस्ट २०१७ : कोर्टात चार्जशीट दाखल झाली. दोन आरोपींना अटक करण्यात आली.
१७ ऑगस्ट २०१७ : पहिल्यांदा पीडितेनं वेगवेगळ्या स्तरांमध्ये आपली तक्रार पोहचवली. परंतु, तक्रारीत आमदाराच्या नावाचा उल्लेख नसल्यानं पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही.
२४ फेब्रुवारी २०१८ : पीडिेतेच्या आईनं उन्नावच्या चीफ ज्युडिशिअल मॅजिस्टेट्र कोर्टात सीआरपीसी कलम १५६ (३) नुसार एफआयआर दाखल करण्याची मागणी केली.
३ एप्रिल २०१८ : कोर्टात पीडितेच्या आईच्या अर्जावर सुनावणी झाली. सुनावणीनंतर ३ एप्रिल रोजी मुलीच्या वडिलांना आमदार सेंगरचा भाऊ अतुल सिंह सेंगर आणि त्याच्या साथीदारांकडून मारहाण करण्यात आली. पोलिसांनी यावेळी तक्रार दाखल केली पण पीडितेच्या वडिलांवर...
आणि तीदेखील सशस्त्र कायद्यांतर्गत... दोन दिवसांसाठी ते पोलिसांच्या ताब्यात होते.
५ एप्रिल २०१८ : पीडितेच्या वडिलांना मेडिकल तपासणीनंतर तुरुंगात धाडण्यात आलं. त्यांना करण्यात आलेल्या मारहाणीवर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.
८ एप्रिल २०१८ : पीडितेनं कुलदीप सिंह सेंगर याच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्याची मागणी करत लखनऊमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारी घरासमोर आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.
९ एप्रिल २०१८ : दुसरीकडे, मेडिकल तपासणीनंतर तुरुंगात हलवलेल्या पीडितेच्या वडिलांनी काही तासांतच जिल्हा रुग्णालयात शेवटचा श्वास घेतला.
१० एप्रिल २०१८ : या बातमीनंतर देशात एकच खळबळ उडाली आणि प्रकरण तापलं. त्यानंतर शासनाच्या आदेशानंतर एसपींनी सहा पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई करत त्यांना निलंबीत करण्यात आलं. तसंच मारहाणीच्या आरोपात चार आरोपींना अटक करण्यात आली.
१० एप्रिल २०१८ : पोस्टमॉर्टेम अहवालात मारहाण झाल्यानं पीडितेच्या वडिलांचा मृत्यू झाल्याचं समोर आल्यानंतर पोलिसांनी आमदाराच्या भावाला अटक केली
११ एप्रिल २०१८ : अलाहाबाद उच्च न्यायालयानं या घटनेत स्वत:हून लक्ष घातलं. त्यानंतर उत्तर प्रदेश सरकारनं हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याचे आदेश दिले.
१२ एप्रिल २०१८ : पीडितेनं बलात्काराचा आरोप केल्यानंतर जवळपास १३ महिन्यांनी सीबीआयनं आमदार कुलदीप सिंह सेंगर याच्यावर पीडित अल्पवयीन तरुणीवर बलात्कार केल्याच्या आरोपाची नोंद केली
१३ एप्रिल २०१८ : कुलदीप सिंह सेंगरची चौकशी करून त्याला ताब्यात घेण्यात आलं. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर त्याला अटक करण्यात आली.
१ जुलै २०१८ : सीबीआयनं पहिली चार्जशीट दाखल केली. यामध्ये कुलदीप सिंह सेंगरचंही नाव होतं
१३ जुलै २०१८ : दुसरी चार्जशीट दाखल करण्यात आली. यामध्ये पीडितेच्या वडिलांना कथितरित्या फसवण्यासाठी कुलदीप सिंह सेंगर, त्याचे तीन भाऊ, तीन पोलीस अधिकारी आणि आणखीन पाच लोकांच्या नावांचा समावेश होता.
१८ ऑगस्ट २०१८ : उन्नाव बलात्कार प्रकरणातील एका साक्षीदाराचा संदिग्ध परिस्थितीत मृत्यू झाला. त्यानंतर पोस्टमॉर्टेमशिवाय घाईघाईनं त्याच्या मृतदेहाचं दफन करण्यात आलं.
२८ जुलै २०१९ : पीडित मुलगी प्रवास करत असलेल्या गाडीला ट्रकनं धडक दिली. यात पीडितेच्या मावशी आणि काकीचा जागीच मृत्यू झाला. तर पीडित मुलगी आणि तिच्या वकिलांची प्रकृती अजूनही नाजूक अवस्थेत आहे.