मुलगा समजून करत होती प्रेम, पण सत्य समोर आल्यानंतर तरुणीला बसला धक्का; थेट पोलीस ठाण्यात घेतली धाव
उत्तर प्रदेशातील फिरोजाबाद येथे एका तरुणीने मुलगा बनून एका मुलीची फसवणूक केल्याचं समोर आलं आहे. इतकंच नाही तर तिने अश्लील फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले.
उत्तर प्रदेशातील एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. येथील एका विद्यार्थिनीने शिकोहाबाद पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. आपल्यासह शिकणाऱ्या एका मुलीने टॉमबॉय बनून आपली फसवणूक केल्याचा आरोपी मुलीने केला आहे. मुलीने तिला मुलगा समजत प्रेम केलं होतं. पण यावेळी तिने पीडित मुलीकडून हजारो रुपये लंपास केले. इतकंच नाही तर तिला ब्लॅकमेलही केलं.
मिळालेल्या माहितीनुसार, तरुणीने मुलगा असल्याचं नाटक करत पीडित मुलीला आपल्या जाळ्यात ओढलं होतं. इतकंच नाही तिने मुलीचे अश्लील फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते. नोकरी मिळवून देण्याच्या नावाने तिने तरुणीकडून पैसे उकळत तिला लुबाडलं होतं. यानंतर ती वारंवार धमकी देत ब्लॅकमेल करत होती. अखेर पीडित मुलीने कंटाळून पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि हे प्रकरण उघडकीस आलं.
पीडित मुलीने सांगितला घटनाक्रम
पीडित मुलीने सांगितलं आहे की, 2022 मध्ये शिकोहाबाद येथे मांडवी नावाच्या एका मुलीसह ती शिकत होती. एक दिवस मांडवीने तिला आपण मुलगा असून, मानव यादव असल्याचं सांगितलं. मांडवी आजारी असते आणि तिची हजेरी लागावी यासाठी मी तिच्या वेषात येतो असा तिचा दावा होता.
यानंतर तिने आपली खोटी कागदपत्रं दाखवत लष्करात असल्याचं खोटी माहिती दिली. अद्यापही माझं ट्रेनिंग सुरु असल्याचंही तिने सांगितलं होतं. जवळपास चार महिने दोघांमध्ये बोलणं सुरु होतं. यादरम्यान पीडित तरुणीचं तिच्यावर प्रेम जडलं होतं.
यादरम्यान आरोपी तरुणीने आपण तुझ्यासाठी लष्करातील नोकरी सोडून दिल्लीत येत असल्याचं सांगितलं. तसंच आपल्याला उपचारासाठी पैशांची गरज असल्याचं सांगितलं. यानंतर पीडित मुलीने फेब्रुवारीत 15 हजार आणि नंतर 45 हजारांची रक्कम दिली. यानंतर बहिणीसह ती भेटायला गेली होती. काही दिवसांनी त्याच्या वागण्यात बदल दिसू लागला. तो मारहाण करु लागला. तसंच पैशांची मागणी करु लागला. अश्लील व्हिडीओ आणि फोटोंच्या माध्यमातून तो धमकी देऊ लागला.
पोलीस ठाण्यात तक्रार
आरोपी मुलीने इंस्टाग्रामवर अश्लील फोटो पोस्ट केले. घाबरलेली मुलगी फिरोजाबादला पळून गेली आणि कुटुंबीयांनी सगळा प्रकार सांगितला. यानंतर कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपी मुलीसह, निवेदिता, शिखा यादव आणि कमलेश देवी या नातेवाईकांविरोधात गुन्हा दाखल केला.
पोलिसांचं म्हणणं आहे की, याआधीही अशी संवेदनशील प्रकरणं समोर आली आहेत. आम्ही प्रत्येक बाजूने तपास करत आहोत.