भारताला लाजवणारी घटना! कोरियन ब्लॉगरचा तरुणाकडून पाठलाग, व्हिडीओ सुरु असतानाच पँट काढली अन्...
Viral Video: कोरिअन ब्लॉगरचा (Korean blogger) एका तरुणाने पाठलाग केल्याचा धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral Video) झाला आहे. या घटनेनंतर संपूर्ण देशभरातून संताप व्यक्त होत आहे.
Viral Video: राजस्थानच्या (Rajasthan) जोधपूर (Jodhpur) येथे एका कोरिअन ब्लॉगरचा (Korean Blogger) पाठलाग करत छळ करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कोरिअन ब्लॉगरने स्वत: या घटनेचा व्हिडीओ शेअर केला आहे. यानंतर हा व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाला असून संपूर्ण देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. व्हिडीओत तरुणी पायऱ्यांवरुन खाली उतरत असताना तरुण तिचा पाठलाग करताना दिसत आहे. तरुणी व्हिडीओ रेकॉर्ड करत असतानाही तरुण तिचा पाठलाग करणं सोडत नाही. यानंतर तरुणी त्याला पुढे जाऊ देते, तेव्हा तो पुढे जाऊनही थांबतो. ती पुढे जाताच तो तिच्याकडे पाहून हसतो आणि हस्तमैथून करण्यास सुरुवात करतो.
या संपूर्ण घटनेने घाबरलेली तरुणी यानंतर तेथून पळ काढते. व्हिडीओतही तरुणी पळताना दिसत आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनीही त्याची दखल घेतली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून याप्रकरणी सध्या तपास सुरु आहे.
हा व्हिडीओ सोशल मीडियावर अनेकांनी शेअर केला असून दिल्ली महिला आयोगाच्या प्रमुख स्वाती मलिवाल यांनीही शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना त्यांनी लिहिलं आहे की, "एका कोरिअन व्लॉगरने शेअर केलेला एक व्हिडीओ माझ्या पाहण्यात आला. या व्हिडीओ तिचा लैंगिक छळ झाल्याचं दिसत आहे. हे अत्यंत घृणास्पद आणि लाजिरवाणं आहे. असे लोक भारतासारख्या महान देशाची प्रतिमा खराब करत आहेत".
स्वाती मलिवाल यांनी आपण याप्रकरणी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना पत्र लिहून आरोपीविरोधात कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. जोधपूर पोलिसांनी या घटनेची दखल घेत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
"परदेशी तरुणी ब्लॉगरने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत जोधपूरमध्ये छळ झाल्याचं पोस्ट केलं होतं. या पोस्टची दखल घेत आम्ही त्या तरुणाची ओळख पटवत अटक केली आहे," अशी माहिती जोधपूर पूर्वच्या डीसीपी डॉक्टर अमृता दुहान यांनी दिली आहे.
गतवर्षी मुंबईत एका दक्षिण कोरियन ब्लॉगरचा छळ करण्यात आला होता. या व्हिडीओत आरोपी युट्यूबर असणाऱ्या तरुणीला ओढत असल्याचं दिसत होतं. तरुणी नाही म्हणत असताना आरोपी तिला खेचत होता. यानंतर जेव्हा तिने सुटका केली तेव्हा तो अजून एका आरोपीसह बाईकवरुन आला आणि लिफ्ट देण्याचा बहाणा केला. यावेळी तिने आपलं घऱ जवळ असल्याचं सांगत लिफ्ट नाकारली. यानंतर मुंबई पोलिसांनी 24 तासांच्या आत या आरोपींना अटक केली होती. पोलिसांनी तात्काळ कारवाई केल्याने तरुणीने पोलिसांचे आभार मानले होते. तसंच आपण पुन्हा भारतात येऊ असं म्हटलं होतं.