ट्रेन (Indian Railaway) म्हणजे सर्वसामान्यांसाठी लाइफलाइन आहे. परवडणाऱ्या तिकीट दरात सर्वसामान्य प्रवासी ट्रेनने देशातील कोणत्याही कानाकोपऱ्यात प्रवास करु शकतात. आता वेळेसह ट्रेनही बदलत असून, 'वंदे मातरम'सारख्या अत्याधुनिक रेल्वे सेवेत दाखल झाल्या आहेत. प्रवाशांना प्रवास करताना चांगल्या सुखसोयी मिळाव्यात यासाठी रेल्वे प्रयत्न करताना दिसते. मात्र अद्यापही रेल्वे सेवेत अनेक त्रुटी असून त्या वारंवार समोर येत असतात. विशेष म्हणजे, गेल्या काही काळापासून प्रवासी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या तक्रारी मांडत असल्याने रेल्वेलाही त्याची दखल घ्यावी लागत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नुकतंच मुख्तार अली नावाच्या एका प्रवाशाने ट्विटरला फोटो शेअर करत तक्रार केली आहे. ट्रेनच्या सीटमधून रॉड निघाल्याने आपण जखमी झाल्याचा दावा या प्रवाशाने केला आहे. मुख्तार अली यांनी तक्रारीत म्हटलं आहे की, 1 मे रोजी 15036 क्रमाकांच्या ट्रेनमधून मी प्रवास करत होतो. यावेळी त्यांच्या सीटमधून रॉड बाहेर आला होता. या रॉडमध्ये आपली पँट अडकली तसंच आपण जखमी झालो. दरम्यान मुख्तार अली यांनी तक्रार केल्यानंतर रेल्वेनेही त्यावर तात्काळ प्रतिक्रिया दिली. 


मुख्तार अली यांनी ट्विटरला फोटो शेअर केला आहे. या फोटोत रॉड सीटमधून बाहेर आल्याचं दिसत आहे. या ट्विटमध्ये त्यांनी रेल्वेला टॅग करत म्हटलं आहे की, "या हँडलने माझा पार्श्वभाग आणि पँटचं नुकसान केलं आहे. कृपया याची दुरुस्ती करुन घ्या, हे फार भयानक आहे". या ट्विटमध्ये त्यांनी रडतानाचा इमोजीदेखील शेअर केला आहे. 



रेल्वेने दिलं उत्तर - 


मुख्तार अली यांच्या ट्विटला रेल्वेकडूनही तात्काळ उत्तर देण्यात आलं. आवश्यक कारवाई करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्याला सांगण्यात आलं असल्याची माहिती रेल्वेने दिली आहे. तसंच रेल्वेने मुख्तार यांच्याकडे पीएनआर/युटीएसची माहिती आणि मोबाइल नंबर मागितला आहे. जेणेकरुन तक्रार दाखल करता येईल. रेल्वेने यावेळी http://railmadad.indianrailways.gov.in या बेबसाईटवर थेट तक्रार करु शकतो अशी माहिती दिली आहे. तसंच 139 या फोन नंबरवर फोन करुनही तक्रार केली जाऊ शकते असं सांगितलं आहे. 


रेल्वे मंत्रालय सोशलवरही प्रचंड सक्रीय असतं. यामुळेच प्रवासी अनेकदा ट्विटरच्या माध्यमातून आपल्या अडचणी मांडत असतात. यावर रेल्वेकडून तात्काळ कारवाई केली जाते. याआधी एकदा एका महिलेने आपल्या बाळासाठी दूधाची मागणी केली असता, रेल्वेने तीदेखील पूर्ण केली होती. रेल्वे पोलिसांनी ट्रेनमध्ये महिलेला गाठत दूध पुरवलं होतं. 


याशिवाय प्रवासी ट्रेनमधील गैरसोयींच्या तक्रारीही करत असतात. काही दिवसांपूर्वी एका प्रवाशाने ट्रेनच्या शौचालयात पाणी नसल्याची तक्रार केली होती. पाणी नसल्याने आपण शौचास जाऊ शकत नसल्याचं या प्रवाशाने ट्वीटमध्ये म्हटलं होतं. यानंतर अनेकांनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या होत्या.