दिल्ली निवडणुकीत बाजी मारणारे केजरीवाल सांगतायत आवडत्या खाद्यपदार्थांविषयी
खवय्ये केजरीवाल एकदा पाहाच.....
मुंबई : Aam Admi Party (AAP) आम आदमी पार्टी अर्थात 'आप' या पक्षाला दिल्ली निवडणुकीमध्ये प्रशंसनीय यश मिळालं. काही दिवसांपूर्वीच या निवडणुकीचा निकालही जाहीर करण्यात आला. राजकारण, पक्षांमध्ये असणारी स्पर्धा आणि बहुमताची गणितं या साऱ्यामध्ये अरविंद केजरीवाल हे पुन्हा एकदा माध्यमं आणि साऱ्या देशाचं लक्ष वेधून गेले.
आपल्या राजकिय कारकिर्दीमध्ये केजरीवाल यांनी गाठलेली उंची पाहता ते कित्येकांसाठी आदर्शसुद्धा ठरले. असा हा चेहरा राजकारणाच्या वर्तुळात तर सक्रिय असतो. पण, एक सर्वसामान्य व्यक्ती म्हणूनही ते आपलं आयुष्य तितक्याच मनमुरादपणे जगतात. याचीच प्रचिती एका व्हिड़िओतून येत आहे. सोशल मीडियावरील या व्हिडिओमध्ये केजरीवाल हे चक्क त्यांच्या आवडत्या खाद्यपदार्थांविषयी आणि ते कुठे मिळतात या ठिकाणांविषयी सांगताना दिसत आहेत.
'चायनीज बहुत पसंद है..... ', असं म्हणणाऱ्या केजरीवाल यांनी कनॉट प्लेस येथील टेस्ट ऑफ चायना या हॉटेलचं नाव घेत ही आपली पार्टी करण्याचीच जागा झाल्याचं सांगितलं आहे. शिवाय गोलगप्पे खाण्यासाठीसुद्धा आपण काय काय केलं, याचाही उलगडा त्यांनी केला.
एकदा केजरीवाल आणि त्यांची पत्नी सुरक्षा रक्षकांना कोणतीही कल्पना न देता कमला मार्केट परिसरातील 'गोलगप्पे' खाण्यासाठी गेले. इथे मुख्यमंत्री गेले कुठे याची शोधाशोध सुरु झाली. अखेर, कमला मार्केटमध्ये केजरीवाल सापडले. खाण्याच्या बाबतीत केजरीवालांनी सांगितलेली ही ठिकाणं पाहता जर, तुम्ही दिल्लीच्या सफरीवर असाल तर या ठिकाणांना भेट द्यायला काहीच हरकत नाही. कारण, खुद्द मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी या ठिकाणांना पसंती दिली आहे.
पाहा : देवाब्राह्मणाच्या नव्हे, संविधानाच्या साक्षीने अभिनेत्याने बांधली लग्नगाठ
एकिकडे चायनीज खाद्यपदार्थ, दुसरीकडे गोलगप्पे आणि गोडाच्या पदार्थांमध्ये जिलबीला प्राधान्य देणारे केजरीवाल हे घरगुती जेवणही तितक्याच आवडीने खातात. यामध्ये आलू पराठा हा त्यांचा सर्वात आवडीचा पदार्थ. एकंदरच काय, तर राजकारणाप्रमाणेच केजरीवाल यांनी खाण्याच्या सवयींमध्येही उत्तम समतोल राखला आहे, असं म्हणायला हरकत नाही.