Hindu-Muslim Unity: छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यामध्ये पोलिसांनी एका व्यक्तीला हिंदूंच्या भावाना दुखावल्या प्रकरणी अटक केली आहे. हिंदूंविरोधात अपशब्द वापरल्याचा आरोप या व्यक्तीवर आहे. पोलिसांनी गुरुवारी या अटकेसंदर्भात माहिती दिली. विशेष म्हणजे हिंदूंविरोधात अभद्र भाषेत विधानं करणाऱ्या या व्यक्तीला अटक करण्यासाठी पोलिसांना मुस्लिम समाजातील व्यक्तींनी मदत केल्याचंही पोलिसांनी सांगितलं आहे. या प्रकरणाच्या माध्यमातून हिंदू-मुस्लिम ऐक्याचं एक अनोखं उदाहरण पहायला मिळालं आहे.


नेमकं घडलं काय?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुकमा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सुनील शर्मा यांनी या प्रकरणातील आरोपीची ओळख पटल्याचंही सांगितलं. अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव साजिद खान असं असून तो सुकमा शहरातील रहिवाशी आहे. एका स्थानिक व्यक्तीने केलेल्या तक्रारीच्या आधारे धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी साजिदला अटक करण्यात आली. पोलिसांनी बुधवारी रात्री ही कारवाई केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री साजिदने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये त्याने हिंदू धर्मियांबरोबरच भारतीय जनता पार्टी म्हणजेच भाजपाविरोधात अपशब्द वापरले होते. "आरोपीने व्हिडीओमध्ये आपण गोमांस खातो असंही म्हटलं होतं. या व्हिडीओमध्ये तो मांसांचा एक तुकडा हातात घेऊन बसल्याचं दिसत आहे. हा गोमांसाचा तुकडा असल्याचंही तो व्हिडीओत सांगतोय," असं पोलीस म्हणाले. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला. मुस्लिम समाजातील लोकांच्या मदतीनेच साजिदला शोधण्यात पोलिसांना यश आलं.


...म्हणून आम्ही त्याला पकडून दिलं


शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार साजिदविरोधात भारतीय दंड संहिता आणि छत्तीसगड पशू कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सुरु आहे. या प्रकरणासंदर्भात बोलताना बस्तरमधील मुस्लिम समाजाचे सचिव फारुख अली यांनी, आमचा समाज आरोपीने केलेल्या अपमानकारक वक्तव्यांची निंदा करत असल्याचं सांगितलं. तसेच मुस्लिम समाज अशा गुंडांचं समर्थन करत नाही असंही अली यांनी म्हटलं. 


"एका कथित मुस्लिम तरुणाने हिंदू बांधवांविरोधात अपशब्द वापरुन टीका केली. आम्ही या गोष्टीची निषेध करतो. पोलिसांनाही आम्ही आवाहन करतो की या तरुणाविरोधात कठोर कारवाई करावी. सुकमा आणि बस्तरमध्ये हिंदू आणि मुस्लिम कायम एकोप्याने, शांतते एकमेकांबरोबर राहिले आङेत. आम्ही अशा गुंडांची पाठराखण करणार नाही. त्याला शिक्षा देण्यासाठी आम्ही कायदा हातात घेऊ इच्छित नाही. त्यामुळेच आम्ही त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं," असं अली म्हणाले.