पंजाब : आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नेमहीच चर्चेत राहणाऱ्या अभिनेत्री कंगना रनौतला पंजाबमधील शेतकऱ्यांच्या प्रचंड विरोधाला सामोरं जावं लागलं. शुक्रवारी मनालीहून मुंबईला जात असताना शेतकऱ्यांनी किरतपूर साहिब टोल प्लाझा इथं कंगना राणौतच्या ताफ्याला घेराव घातला.  कंगनाने तिच्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल माफी मागावी, अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वाढता तणाव पाहून मोठा पोलीसांचा फौजफाटा घटनास्थळी पाचारण करण्यात आला. बराच वेळ हा गोंधळ सुरू होता. तब्बल दोन तासांनंतर कंगनाने अखेर माफी मागितल्यानंतर शेतकऱ्यांनी तिला जाऊ दिलं.


या जमावात महिलाही मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कंगनाने अनेकवेळा शेतकरी आणि शेतकरी महिलांबद्दल चुकीचे शब्द वापरले आहेत. त्यामुळे जोपर्यंत कंगना माफी मागत नाही, तोपर्यंत तिच्या ताफ्याला पुढे जाऊ दिले जाणार नाही, असं आंदोलकांचं म्हणणं होतं. बराच वेळ गोंधळ झाल्यानंतर पोलिसांनी एका महिलेला कंगनाच्या गाडीजवळ नेलं, कंगनाने या महिलेसमोर माफी मागितली. आणि त्यानंतर शेतकऱ्यांनी जल्लोष केला.


कंगनाने पुन्हा उधळली मुक्ताफळं
या घटनेनंतर कंगना रानौतने आपल्या इन्स्टाग्रामवर शेतकऱ्यांनी गाडी अडवल्याचा व्हिडिओ टाकत पुन्हा मुक्ताफळं उधली. या व्हिडिओत तीने म्हटलं आहे, मी हिमाचलमधून निघाले, पंजाबमध्ये येताच जमावाने मला घेरलं, ही लोकं स्वत:ला शेतकरी म्हणत आहेत. ही लोकं शिव्या देत आहेत, जीवे ठार मारण्याची धमकी देत आहेत. या देशात अशा प्रकारे मॉब लिंचिग होत आहे. माझ्याबरोबर सुरक्षाव्यवस्था नसती तर काय झालं असतं? मोठ्या संख्येने पोलीस असतानाही आम्हाला जाऊ दिलं जात नाहीए, मी राजकीय व्यक्ती आहे का? माझ्याविरुद्ध राजकारण केलं जात आहे, पोलीस नसते तर माझं लिचिंग झालं असतं असं कंगनाने म्हटलं आहे.


कंगनाची वादग्रस्त वक्तव्य
कंगना रानौतने अनेक वेळा वादग्रस्त वक्तव्य केली आहेत. शेतकरी आंदोलन सुरु झाल्यानंतर कंगनाने तिच्या ट्विटर अकाऊंटर एका वृदध महिलेचा फोटो शेअर करत, अशी लोकं काही रुपयांसाठी आंदोलनात जातात असं म्हटलं होतं. यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. या प्रकारानंतर कंगनाविरोधात पंजाबमधील महिला आक्रमक झाल्या होत्या. 


मोदी सरकारने तीन कृषी कायदे मागे घेतल्यानंतरही कंगनाने शिख समाजाविरोधात वक्तव्य केलं होतं.