बाबो... एकाच महिन्यात 27000 किलो सोने खरेदी! 10 महिन्यात `या` बँकेनं घेतलं 77000 किलो सोनं
Gold Reserve: या मोठ्या आर्थिक व्यवहारासंदर्भातील खुलासा भारतीय संस्थेने नाही तर एका अंतरराष्ट्रीय संस्थेनं केला आहे. काही महत्त्वाची आकडेवारी यामधून समोर आली आहे. नेमकं काय म्हटलं आहे पाहूयात...
Gold Reserve: भारतामधील केंद्रीय बँक असलेल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने केलेल्या एका मोठ्या व्यवहारासंदर्भातील माहिती समोर आली आहे. केंद्रीय बँकांकडून जागतिक पातळीवर ऑक्टोबर महिन्यामध्ये तब्बल 60 टन सोने खरेदी करण्यात आलं असून यामध्ये भारतातील बँकांची बँक असलेल्या रिझर्व्ह बँकेचा वाटा जळपास 50 टक्क्यांच्या आसपास आहे. खरेदी झालेल्या सोन्यापैकी 27 टन सोने एकट्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने खरेदी केले आहे, अशी माहिती जागतिक सुवर्ण परिषदेने गुरुवारी दिली.
भारताने 5 पट अधिक सोनं घेतलं
रिझर्व्ह बँकेने विद्यमान कॅलेंडर वर्षामध्ये जानेवारी ते ऑक्टोबर या दहा महिन्यांच्या कालावधीत तब्बल 77 टन सोन्याची खरेदी केली आहे. गत वर्षीशी तुलना केली तर 2023 च्या तुलनेत यंदा भारताच्या मध्यवर्ती बँकेने पाचपट अधिक सोनं खरेदी केलं आहे. या खरेदीमुळे भारताचा एकूण सोन्याचा साठा आता 882 टनांवर पोहोचला आहे. या एकूण सोन्यापैकी 510 टन सोने भारतामध्येच रिझर्व्ह बँकेच्या तिजोरीत सुरक्षित आहे. या आकडेवारीवरून असे दिसून येत आहे की, सेंट्रल बँक ऑफ द रिपब्लिक ऑफ तुर्कीयेने 17 टन सोन्याची भर घातली घातली आहे. ज्यामुळे ऑक्टोबर हा निव्वळ खरेदीचा सलग 17 वा महिना ठरला आहे. नॅशनल बँक ऑफ पोलंडने ऑक्टोबरमध्ये 8 टन निव्वळ खरेदी नोंदवली, हा खरेदीचा सलग सातवा महिना आहे.
या दोन देशांनाही भरपूर सोनं केलं खरेदी
उदयोन्मुख देशांमधील तुर्कीये आणि पोलंडच्या मध्यवर्ती बँकांनी सर्वाधिक सोने खरेदी केल्याची माहिती समोर येत आहे. तुर्कीयेने जानेवारी-ऑक्टोबर 2024 या 10 महिन्यांच्या कालावधीमध्ये 72 टन सोनं विकत घेतलं आहे. तर दुसरीकडे याच 10 महिन्यांमध्ये पोलंडने तब्बल 69 टन सोन्याची खरेदी केली आहे. या वर्षी नोंदवलेल्या सोन्याच्या एकूण जागतिक निव्वळ खरेदीमध्ये भारत, तुर्कीये आणि पोलंड या तीन देशांच्या मध्यवर्ती बँकांचा वाटा 60 टक्के राहिला आहे.
रेपो रेट स्थिर ठेवणार
भारतीय रिझर्व्ह बँक अर्थात आरबीआयच्या पतधोरण बैठकीतील अंतिम निर्णय आज जाहीर केला आहे. आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांता दास यांनी पत्रकार परिषदेमध्ये याची घोषणा केली. मागील काही द्वैमातिक आणि त्रैमासिक पतधोरण बैठकांदरम्यान देशातील सर्वोच्च बँक संस्था म्हणजेच आरबीआयकडून रेपो रेटमध्ये बदल केले जावेत अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती. मात्र याकडे कानाडोळा करत आरबीआयनं आज जाहीर केलेल्या नव्या पतधोरणामध्येही रेपो रेट स्थिर ठेवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. 6 डिसेंबर रोजी झालेल्या पतधोरणानुसार रेपो रेटमध्ये कोणतेही बदल आरबीआयने केलेले नाहीत. सध्याच्या घडीला रेपो रेट 6.50 टक्क्यांवर स्थिर असून, ही आकडेवारी बदलणार नसल्याचं आरबीआयकडून सांगण्यात आलं आहे.