पाकिस्तानचा निषेध करा पण कोणाला त्रास देऊ नका- आदित्य ठाकरे
ही सर्व देशवासीयांनी एकत्र राहण्याची वेळ आहे.
मुंबई: पुलवामा हल्ल्यानंतर देशभरात आक्रोश आहे. पाकिस्तानला उत्तर देणे गरजेचे आहे. मात्र, हे करताना कोणालाही त्रास होणार नाही, याचे भानही बाळगा, असे आवाहन युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले. ते गुरुवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांना यवतमाळमध्ये युवासेनेच्या कार्यकर्त्यांकडून काश्मिरी विद्यार्थ्यांना मारहाण करण्यात आल्याच्या घटनेबद्दल प्रतिक्रिया विचारण्यात आली. त्याला उत्तर देताना आदित्य ठाकरे यांनी म्हटले की, यवतमाळमध्ये जे काही घडले त्याची चौकशी मी करेन, त्यानंतर कारवाईचे आदेश देईन. पुलवामा हल्ल्यामुळे देशभरात आक्रोश आहे. अशावेळी पाकिस्तानचा निषेध करणे गरजेचे आहे. मात्र, त्यामुळे कोणालाही त्रास होणार नाही, याचे भान बाळगा. आता सर्व देशवासीयांनी एकत्र राहण्याची वेळ आहे, असेही आदित्य यांनी सांगितले.
VIDEO:युवासेनेच्या कार्यकर्त्यांकडून काश्मिरी विद्यार्थ्यांना मारहाण
याशिवाय, शिवसेना-भाजप युतीसंदर्भातही त्यांनी भाष्य केले. देश, शेतकरी आणि हिंदुत्वासाठी युती झाली आहे. दोन्ही पक्षाच्या महत्त्वाच्या नेत्यांनी यावर बोलून झाले आहे. त्यामुळे आता फार चर्चा करायची गरज नाही. युती आता पुढे जात आहे. मुख्य मागण्या झाल्यामुळेच युती झाल्याचे आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले.
दानवेंविरोधात लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी अर्जुन खोतकर शिवसेना सोडणार?
तत्पूर्वी आदित्य ठाकरे यांनी जालन्यातील शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांची भेटही घेतल्याचे समजते. युती झाल्यानंतरही अर्जुन खोतकर जालना मतदारसंघातून भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याविरोधात निवडणूक लढवायला उत्सुक आहेत. अर्जुन खोतकर हे आपल्या निर्णयावर ठाम असल्यामुळे आता शिवसेना यावर काय तोडगा काढणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.