यवतमाळ: पुलवामा हल्ल्यानंतर काही समाजकंटकांकडून काश्मिरी विद्यार्थ्यांना लक्ष्य करण्याचे प्रकार घडत आहेत. आता या प्रकाराचे लोण महाराष्ट्रातही पसरताना दिसत आहे. यवतमाळमध्येही युवासेनेच्या काही अतिउत्साही कार्यकर्त्यांकडून काश्मिरी विद्यार्थ्यांना मारहाण करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. वाघापूर येथील वैभव नगर परिसरात बुधवारी रात्री हा प्रकार घडला. यावेळी युवासेनेच्या १० ते १२ कार्यकर्त्यांना एका काश्मिरी विद्यार्थ्याला मारहाण केली. तसेच त्याला जबरदस्तीने 'वंदे मातरम' आणि 'भारत माता की जय' अशा घोषणाही द्यायला लावल्या. या घटनेचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या व्हीडिओत युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी एका काश्मिरी विद्यार्थ्याला घेरलेले दिसत आहे. तुझा ओळखीचा कोणी दहशतवादी आहे का? तुम्ही लोक इथे शिक्षणासाठी येतात आणि तिथे आमच्या जवानांना मारता, असे सांगत युवासेनेचे कार्यकर्ते या विद्यार्थ्याला मारहाण करताना दिसत आहेत. यावेळी काश्मिरी विद्यार्थी गयावया करताना दिसत आहे. माझा या सगळ्याशी कोणताही संबंध नसल्याची विनवणीही त्याने केली. मात्र, तरीही युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी संबंधित तरुणाला मारहाण केली. या घटनेनंतर लोहारा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. यानंतर पोलिसांकडून या घटनेचा तपास सुरु आहे.
पुलवामा येथे जैश-ए-मोहम्मदच्या आत्मघातकी दहशतवाद्याने घडवून आणलेल्या स्फोटात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (सीआरपीएफ) ४० जवान शहीद झाले होते. या हल्ल्यामुळे संपूर्ण देशात संतापाचे वातावरण आहे.