संशयी दारूड्या पत्नीमुळे बाली जाणाऱ्या विमानाचे चेन्नईमध्ये इमर्जन्सी लँडिंग
कतार एअरवेजच्या दोहाहून बालीला जाणाऱ्या विमानाला रविवारी एका इराणी महिलेने घातलेल्या गोंधळामुळे अचानक चेन्नईमध्ये लँडिंग करावे लागले.
चेन्नई : कतार एअरवेजच्या दोहाहून बालीला जाणाऱ्या विमानाला रविवारी एका इराणी महिलेने घातलेल्या गोंधळामुळे अचानक चेन्नईमध्ये लँडिंग करावे लागले.
या महिलेला आपल्या पतीवर संशय होता की तो तिला धोका देत आहे. प्रवासादरम्यान तिने आपल्या झोपलेल्या पतीच्या बोटांच्या ठसा वापरून (फिंगरप्रिंट स्कॅनर) फोन अनलॉक केला. त्यानंतर तिने जे पाहिले ते धक्कादायक होते. तिचा संशय खरा ठरला.
यानंतर तिने विमानातच गोंधळ घालायला सुरूवात केली. त्यामुळे विमान चेन्नईमध्ये उतरवावे लागले.
टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या बातमीनुसार, विमानातील कर्मचाऱ्यांनी या महिलेला समजविण्याचा प्रयत्न केला. पण तिने त्यांच्याशीही उध्दटपणे वागण्यास सुरूवात केली. महिला ऐकत नाही हे पाहून पायलटने विमान चेन्नईमध्ये लँड करण्याचा निर्णय घेतला. विमान लँड केल्यानंतर दाम्पत्याला विमानातून उतरविण्यात आले आणि विमानाने बालीसाठी उड्डाण केले.
दाम्पत्याला एक छोटा मुलगाही आहे. प्रकरण शांत होईपर्यंत त्यांना चेन्नई विमानतळावर ठेवण्यात आले. नंतर त्यांना क्वालालंपूरच्या विमानात बसून देण्यात आले. तेथून त्यांना कनेक्टिंग फ्लाइट होती.
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा रक्षकांच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणाला दुजोरा दिला. ५ नोव्हेंबर रोजी १० वाजता कतार एअरवेजच्या फ्लाइट क्यू आर ९६२ ला चेन्नईला डायव्हर्ट करण्यात आले. अधिकाऱ्यांनी सांगितले की महिला नशेत होती. तीने फ्लाइटमधील क्रू मेंबर्सला गैरवर्तणूक केली.