पणजी :  पंजाबपाठोपाठ गोवा विधानसभा निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांच्या आप पक्षाने गोव्यात मुख्यमंत्री पदासाठी एक चर्चेतील चेहरा समोर आणला आहे. व्यवसायाने वकील असलेले अमित पालेकर हे आपचे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असतील. अरविंद केजरीवाल यांनी बुधवारी पणजीत ही घोषणा केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, भंडारी समाज हा गोव्यातील खूप मोठ्या समाजाचा भाग आहे. 35 ते 40 टक्के लोक या समाजचे आहेत. 1961 मध्ये गोवा स्वतंत्र झाला. तेव्हापासून आजपर्यंत साठ वर्षात या समाजातील माणूस अडीच वर्षे मुख्यमंत्री झाला होता.


'काही पक्षांनी आमच्यावर आम्ही जातीचे राजकारण करत असल्याचा आरोप केला. मात्र, त्या पक्षांनी भंडारी समाजाचा एकही चेहरा मुख्यमंत्री केला नाही. या समाजातील लोकांनी रक्त आणि घाम गाळून गोव्याच्या प्रगतीसाठी हातभार लावला आहे. त्यांच्या मनात न्यायाची भावना आहे. त्यामुळेच आम्ही भंडारी समाजातून मुख्यमंत्री म्हणून पालेकर हा चेहरा देत आहोत असे सांगितले.


कोण आहेत अमित पालेकर?
अमित पालेकर हे गोव्यातील सांताक्रूझ परिसरात दीर्घकाळापासून सक्रिय आहेत. ते व्यवसायाने वकील आहेत. पण, सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्यांची बरीच ओळख आहे. भ्रष्टाचाराचा मुद्दा ते नेहमीच मांडत आले आहेत. पालेकर हे  2017 पासून ते आम आदमी पक्षाशी संबंधित असले तरी त्यांच्यासाठी राजकारण नवीन नाही. त्यांची आई दहा वर्षे सरपंच होती.


कोरोना काळात अनेकांना मदत 
अमित पालेकर यांनी कोरोना काळात लोकांना खूप मदत केली. देशभरातील रुग्णालयांमध्ये खाटांचा तुटवडा असताना पालेकर यांनी स्वत:हून 135 खाटा स्थानिक रुग्णालयाला दान केल्या. रुग्णांना उपचार देण्यासोबतच त्यांनी लॉकडाऊनमध्ये प्रवास करणाऱ्या कुटुंबांनाही मदत केली.


उपोषणाने सरकार हादरले
पालेकर पूर्वी गोव्यात खूप चर्चेत होते. जुने गोवा हेरिटेज कॉम्प्लेक्समध्ये बेकायदेशीरपणे बांधण्यात येत असलेल्या बंगल्याविरोधात त्यांनी उपोषण केले. त्यांच्या या हालचालीने गोवा सरकारलाही धक्का बसला. सरकारला त्यांच्यापुढे झुकून वादग्रस्त रचनेवर कारवाई करावी लागली. या उपोषणादरम्यानच अरविंद केजरीवाल यांनी त्यांची भेट घेतली होती.