अग्निपथ योजना : अग्निपथ योजनेला देशात काही राज्यांमध्य विरोध होत असताना महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आणि उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी 'अग्निवीर यांच्यासाठी मोठी घोषणा केली आहे. आनंद महिंद्रा यांनी अग्निवीरांना लष्करात 4 वर्षांच्या सेवेनंतर नोकऱ्या देण्याची घोषणा केली आहे. त्यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. अग्निपथ योजनेवरुन सुरु असलेल्या हिंसाचाराबाबत त्यांनी दु:ख व्यक्त केले आणि अग्निवीरांना नोकरीत संधी देण्याची घोषणा केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आनंद महिंद्रा यांनी ट्विट करत म्हटले की, 'अग्निपथ योजनेवरून झालेल्या हिंसाचारामुळे दु:ख झाले आहे. गेल्या वर्षी जेव्हा या योजनेची कल्पना सुचली तेव्हा मी ते सांगितले होते आणि आता पुन्हा पुन्हा सांगतो की या अंतर्गत अग्निवीर जी शिस्त आणि कौशल्य शिकेल त्यामुळे त्याला उत्तम रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. ते म्हणाले की, महिंद्रा समूह अशा प्रशिक्षित, सक्षम तरुणांच्या भरतीचे स्वागत करतो.'



ते पुढे म्हणाले की, 'कॉर्पोरेट क्षेत्रातील अग्निवीरांची प्रचंड रोजगार क्षमता, नेतृत्व, टीमवर्क आणि शारीरिक प्रशिक्षण यामुळे उद्योगाला अग्निवीरांच्या रूपात बाजारपेठेनुसार तयार व्यावसायिक उपलब्ध होतील. ऑपरेशन्सपासून प्रशासन आणि पुरवठा साखळी व्यवस्थापनापर्यंत संपूर्ण बाजारपेठ त्यांच्यासाठी खुली असेल.


या योजनेअंतर्गत अग्निवीरांची लष्कर, हवाई दल आणि नौदलात भरती केली जाईल, जिथे त्यांना 4 वर्षांसाठी सेवा द्यावी लागेल. त्यानंतर प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना तैनात केले जाईल. 4 वर्षानंतर, 25% अग्निवीरांना सैन्यात पुढे कायम केले जाईल. या योजनेचे विरोधक असा युक्तिवाद करत आहेत की यामुळे बेरोजगारी आणखी वाढेल आणि त्यांचे करियर अनिश्चित होईल. मात्र, सरकार हा दावा खोडून काढत आहे.


केंद्राच्या अग्निपथ योजनेंतर्गत यावर्षी 46 हजार तरुणांना सहस्त्र दलात सामील करून घेतले जाणार आहे. योजनेनुसार तरुणांची चार वर्षांसाठी भरती केली जाईल आणि त्यांना 'अग्नीवीर' म्हटले जाईल. अग्निवीरांचे वय 17 ते 21 वर्षे आणि पगार 30 ते 40 हजार दरमहा असेल. या योजनेनुसार भरती झालेल्या तरुणांपैकी २५ टक्के तरुणांना सैन्यात पुढील संधी मिळणार असून उर्वरित 75 टक्के तरुणांना नोकरी सोडावी लागणार आहे. कोरोनामुळे यावर्षी वयोमर्यादा 23 वर्षे करण्यात आली आहे.