Project Cheetah : मध्य प्रदेशातील (MP News) असलेल्या कुनो नॅशनल पार्कमधून (Kuno National Park) आणखी एका चित्त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. 'उदय' नावाच्या चित्त्याच्या (uday cheetah) मृत्यूनंतर कुनो नॅशनल पार्क व्यवस्थापनाला धक्का बसला आहे.  उदयला दक्षिण आफ्रिकेतून (south africa) कुनो येथे आणण्यात आले होते. दरम्यान याआधी मादी चित्ता साशाचा मृत्यू झाला होता. दोघांच्या मृत्यूमुळे आता 'प्रोजेक्ट चित्ता'ला आणखी मोठा धक्का बसला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही दिवसांपूर्वी नामिबिया येथून भारतात आणलेल्या पहिल्या तुकडीतील आठ चित्त्यांपैकी दोन चित्त्यांचा मृत्यू झाला आहे. याआधी साशा या मादी चित्त्याचा किडनीच्या आजारामुळे मृत्यू झाला होता. रविवारी आणखी एका चित्त्याच्या मृत्यूने वनविभागाच्या अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. दक्षिण आफ्रिकेतून भारतात आणलेल्या उदय नावाच्या चित्ताचा आजाराने मृत्यू झाल्याची माहिती वनविभागाने दिली आहे.



17 सप्टेंबर 2022 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी नामिबिया येथून आठ चित्ते भारतात आणण्यात आले. मध्य प्रदेशातील श्योपूर जिल्ह्यातील कुनो राष्ट्रीय उद्यानात या चित्त्यांना महिनाभर विलगीकरणात ठेवण्यात आले होते. त्यानंतर त्यांना मोठ्या पिंजऱ्यात सोडण्यात आले होते. त्यानंतर पहिल्या तुकडीतील चार चित्त्यांना कुनोच्या जंगलात सोडण्यात आले. मात्र, त्यांनतर मादी चित्ता साशाचा मूत्रपिंडाच्या समस्येमुळे आजारी होती. साशा उपचाराला प्रतिसाद देत नव्हती. सहा महिन्यांपासून ती आजारी होती. त्यामुळे तिच्यावर कुनो पार्कमधील विलगीकरणाच्या पिंजऱ्यात परत ठेवण्यात आले होते. मात्र त्यातच साशाचा मृत्यू झाला.


मध्य प्रदेशचे मुख्य वनसंरक्षक जे एस चौहान यांनी उदयच्या मृत्यूबाबत माहिती दिली आहे. "आम्ही दररोज चित्त्यांची तपासणी करतो. शनिवारी आमचे पथक तपासणीसाठी गेले होते तेव्हा सर्व चित्ते व्यवस्थित होते. रविवारी सकाळी जेव्हा आमचे पथक तपासणीसाठी बाहेर पडले तेव्हा उदय आजारी दिसत होता. तो मान खाली घालून चालत होता. तपासणी पथकाने तात्काळ उद्यान्याच्या संचालकांना कळवले आणि पशुवैद्यकीय डॉक्टरांच्या पथकाला आत पाठवण्यात आले. उदयला बेशुद्ध करून तपासणीसाठी बाहेर आणण्यात आले. त्यानंतर त्याला औषध आणि सलाईन लावण्यात आले. मात्र उपचारादरम्यानच दुपारी चार वाजता त्याचा मृत्यू झाला. 24 एप्रिल रोजी सकाळी जबलपूर आणि भोपाळचे पशुवैद्यकीय डॉक्टर शवविच्छेदन करण्यासाठी कुनो येथे आल्यानंतरच उदयच्या मृत्येचा कारण कळेल," अशी माहिती जे एस चौहान यांनी दिली.