नवी दिल्ली : काँग्रेस ज्येष्ठ नेते अशोक गेहलोत हे राजस्थानचे पुढील मुख्यमंत्री असतील, असे वृत्त 'एएनआय'ने दिलेय. अखिल भारतीय काँग्रेस समिती आज सायंकाळी चार वाजता पत्रकार परिषदेत याची अधिकृत घोषणा केली. दरम्यान, राजस्थान प्रदेश अध्यक्ष सचिन पायलट यांच्यावर उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राजस्थानच्या मुख्यमंत्रिपदाचाही तिढा अखेर सुटलाय. मध्य प्रदेशपाठोपाठ राजस्थानमध्येही अनुभवी नेतृत्वाला मुख्यमंत्रिपदाची संधी देण्यात आलीय. माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांची मुख्यमंत्रिपदी निवड कऱण्यात आलीय. तर नाराजी दूर करण्यासाठी सचिन पायलट यांना उपमुख्यमंत्रिपदावर वर्णी लावण्यात आलीय. दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसचे राजस्थानातील पक्षनिरीक्षक के सी वेणूगोपाल यांनी ही घोषणा केली. गेल्या २४ तासांपासून याबाबत नाट्यमय घडामोडी घडत होत्या. सचिन पायलट हे मुख्यमंत्रिपदासाठी अडून बसलेले होते. मात्र आगामी लोकसभेच्या निवडणुका पाहता काँग्रेसला अनुभवी नेतृत्व हवं होतं. त्यामुळे गेहलोत यांना पसंती देण्यात आली. 



राजस्थान विधानसभेच्या 2018च्या निवडणुकीत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष म्हणून ठरला आहे. काँग्रेसला बहुमतासाठी एक जागा कमी पडली. काँग्रेसला राष्ट्रीय लोकदलने (आरएलडी) पाठिंबा दिलाय. राजस्थानमध्ये भाजप सरकार सत्तेतून खाली खेचण्यासाठी काँग्रेस प्रदेश अध्यक्ष सचिन पायलट आणि अशोक गेहलोत यांनी मोठी मेहनत घेतली. काँग्रेस प्रदेश अध्यक्षपद युवा नेतृत्वाकडे देऊन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सचिन पायलट यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली. ही जबाबदारी सचिन पायलट यांनी यशस्वी पार पाडली. त्यामुळे मुख्यमंत्री पदासाठी ते दावेदार मानले जात आहे. 



दरम्यान, काँग्रेस पक्षाचे राहुल गांधी यांनी अशोक गेहलोत आणि राजस्थान काँग्रेसचे अध्यक्ष सचिन पायलट यांच्यासह अनेक मॅरेथॉन बैठका घेतल्या आहेत. सचिन पायलट यांच्या समर्थकांनी रस्ता आणि रेल्वे वाहतूक रोखली. त्यांच्या समर्थकांनी राजस्थानचे मुख्यमंत्री सचिन पायलट यांनाच करावे, यासाठी मोठा दबाव वाढवलाय. तसेच अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांची समजूत काढताना राहुल गांधी यांना अजून यश आलेले नाही. मात्र, ज्येष्ठ नेते अशोक गेहलोत यांना ज्येष्ठ नेत्या आणि माजी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि प्रियांका गांधी यांची पसंती आहे. तर राहुल गांधी यांनी सचिन पायलट यांच्या नावाला होकार दिलाय. त्यामुळे मुख्यमंत्री पद कोणाला द्यावे, हा तिढा कायम आहे.


दरम्यान, काँग्रेस सूत्रांच्या हवाल्याने एएनआयने वृत्त दिलेय की, राजस्थानचा तिढा सुटलाय. अशोक गेहलोत यांना मुख्यमंत्री पद तर सचिन पायलट यांना उपमुख्यमंत्री पद देण्याचे ठरलेय. याबाबतची घोषणा थोड्याच वेळात दिल्लीत होण्याची शक्यता आहे.



दुसरीकडे काँग्रेस आमदारांची बैठक घेण्यासाठी हालचाली सुरु झाल्यात. थोड्याच वेळात जयपूरमध्ये अशोक गेहलोत पोहोचतील. तेच पुढील मुख्यमंत्री असतील असं स्पष्ट करण्यात आलेय. त्यामुळे मुख्यमंत्री शपथ विधी समारंभ हा 17 डिसेंबरला होण्याची शक्यता आहे.


राहुल गांधी यांनी आज तिसऱ्या दिवशी आपल्या घरी प्रदेश प्रभारी अविनाश पांडे, पर्यवेक्षक के. सी. वेणुगोपाल, अशोक गेहलोत आणि सचिन पायल यांच्यासोबत बैठक घेतली. बैठकीनेतर राहुल गांधी यांनी राजस्थानच्या मुख्यमंत्री पदाचे दावेदार अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यासोबत हास्याचा फोटो ट्विट केलाय. त्यामुळे हा तिढा सुटल्याचा सांगण्यात येत आहे.