Assam CM Hemant Biswa Sarma on Shahrukh Khan: आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा (Assam CM Hemant Biswa Sarma) यांनी आपण बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानला (Shahrukh Kan) ओळखत नाही असं विधान केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. यानंतरही मुख्यमंत्री आपल्या विधानावर ठाम असून आपल्याला शाहरुखबद्दल फार काही माहिती नसल्याचं म्हणाले आहेत. आपल्याला शाहरुख खानचा फोन आल्याची माहिती त्यांनी दिली असून, 'पठाण' (Pathaan Film) चित्रपटाच्या स्क्रिनिंगमध्ये कोणताही अडथळा येणार नाही अशी हमी दिली आहे. 25 जानेवारीला 'पठाण' चित्रपट प्रदर्शित होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शाहरुख खानसह झालेल्या आपल्या संभाषणाबाबत बोलताना ते म्हणाले की "आपल्याला शनिवारी संध्याकाळी शाहरुख खानचा मेसेज आला होता. मी शाहरुख खान आहे. मला तुमच्याशी बोलायचं आहे," असं या मेसेजमध्ये लिहिलं होतं.


"माझ्य़ाशी बोलण्यासाठी अनेकजण रांगेत उभे होते. त्या सर्वांशी बोलल्यानंतर मी रात्री 2 वाजता त्याला मेसेज पाठवून मी सध्या उपलब्ध असल्याचं सांगितलं. यानंतर त्याने फोन केला आणि माझा चित्रपट लवकरच प्रदर्शित होत असून त्यात कोणताही अडथळा येणार नाही अशी आशा व्यक्त केली," अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. 


"मी त्याला चित्रपटाचं नाव विचारलं असता त्याने 'पठाण' असं सांगितलं. मी त्याला कोणताही गोंधळ होणार नाही याची हमी दिली," असं सांगताना मुख्यमंत्र्यांनी आसामच्या नावावर डाग लागेल अशी कोणतीही गोष्ट होऊ देणार नाही सांगितलं.


दरम्यान मुख्यमंत्र्यांनी आपल्याला हिंदी चित्रपटसृष्टीबद्दल फारशी माहिती नसल्याचं म्हटलं आहे. ते म्हणाले की "मला अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, जितेंद्र यांच्याबद्दल  माहिती आहे. पिढीनुसार आपले आवडते अभिनेते बदलत असतात". दरम्यान त्यांना शाहरुख खान कोण? या विधानाबद्दल विचारण्यात आलं असता ते म्हणाले "मी त्याला ओळखण्याचा काय संबंध? मला खरंच तो इतका मोठा व्यक्ती आहे याची कल्पना नव्हती. मी अनेक चित्रपट पाहत नाही".


"माझ्या राज्यातील सर्व तीन कोटी लोकांना तसंच मला मत देणाऱ्यांनाही मी ओळखत नाही," असं मुख्यमंत्री म्हणाले. पठाण चित्रपटाचं पोस्टर फाडण्यासंबंधी विचारण्यात आलं असता ते म्हणाले "पोस्टर फाडणं हा काही गुन्हा नाही. कोणत्या कायद्यांतर्गत त्यांच्यावर कारवाई केली जाऊ शकते याची माहिती आपण मागवत आहोत. राजकारण्यांचे पोस्टर नेहमीच फाडले जातात, पण त्याच्यावर चर्चा होत नाही. लोकांनी आपली मानसिकता बदलण्याची गरज आहे".