नवी दिल्ली : देशातील तीन राज्यांच्या होणाऱ्या निवडणुकांमुळे या पत्रकार परिषदेमुळे सगळ्यांचे लक्ष लागले होते. तसेच महाराष्ट्र आणि हरियाणा या राज्यातल्या विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम, निवडणूक आयोगाकडून आज जाहीर करण्यात आला आहे. २१ ऑक्टोबरला मतदान होणार आहे. तर २४ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. २७ सप्टेंबरला निवडणुकीची अधिसूचना जाहीर होणार आहे. तर ४ ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्जाची मुदत असणार आहे. ५ ऑक्टोबरला अर्जाची छाननी होणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी याबाबतची माहिती दिली. त्यामुळे या पत्रकार परिषदेची उत्सुकता संपली असून आजपासून निवडणूक आचारसंहिता लागली आहे. महाराष्ट्र आणि हरियाणा या राज्यात आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

२१ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये मतदान होणार आहे. २४ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे दिवाळी पूर्वी निवडणुकीचे फटाके वाजणार आहे. महाराष्ट्रात १.८ लाख ईव्हीएमचा वापर करण्यात येणार आहे. दरम्यान, २८ लाख रुपयांपेक्षा अधिक खर्च करण्याची परवानगी नाही, असे सुनील अरोरा यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. निवडणुकीचा अर्ज भरताना एकही रकाना रिकामा ठेवला गेला तर उमेदवाराचा निवडणूक अर्ज बाद ठरवला जाणार आहे. तर महाराष्ट्रातील सातारा लोकसभा पोटनिवडणूक होणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.



निवडणूक अर्जाच्यावेळी गुन्ह्याची माहिती देणे बंधनकारक करण्यात आले आहे. सोशल मीडियावर निवडणूक आयोगाची करडी नरज असणार आहे. तसेच या निवडणुकीत पैशाचा गैरवापर टाळण्यासाठी खास खबरदारी घेण्यात आली असून तशी पथके स्थापन करण्यात आली आहेत. नक्षल भागातील गडचिरोली, गोंदियात विशेष सुरक्षा व्यवस्था असेल, असे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी यावेळी स्पष्ट केले.



महाराष्ट्रात २८८ आणि हरियाणात ९० जागांसाठी मतदान होणार आहे. महाराष्ट्रात ८ कोटी ९४ लाख मतदार नोंदणी झाली आहे. ते आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. महाराष्ट्र राज्यात विधानसभा निवडणुका कधी होणार, निवडणुकांचा कार्यक्रम काय असेल याची उत्सुकता सगळ्यांनाच लागली होती. काल निवडणूक अधिकाऱ्यांची बैठक झाली. महाराष्ट्रासह झारखंड आणि हरियाणा या राज्यातही विधानसभा निवडणुका होत आहेत. तीन्ही राज्यांत निवडणूक आयोगाच्या पथकाने पाहणी करून अहवाल सादर केला आहे. त्यानंतर काल निवडणूक आयोगाने आढावा घेतला होता. आज याबाबत निवडणूक आयोगाने दुपारी १२ वाजता पत्रकार परिषद घेतली आणि त्यानंतर निवडणुकीची घोषणा केली. 


दरम्यान, निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार झारखंडमध्ये निवडणुका घेण्यास वेगवेगळ्या अटी आहेत. आता झारखंड विधानसभेची मुदत संपायला तीन महिन्यांहून अधिक कालावधी आहे. झारखंडमध्ये विधानसभा निवडणुका डिसेंबरमध्ये होणार आहेत. कारण तेथे विधानसभा स्थापनेची तारीख जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात आहे.