मुंबई : वयाच्या बाराव्या वर्षी सहसा मुलं, मित्रमंडळींसोबत खेळत असतात. कुणी अभ्यासात किंवा मग इतर उपक्रमांत रमलेलं असतं. असं असतानाच एक १२ वर्षांचा मुलगा सध्या देशाच्या राजकीय पटलावर चर्चेत आला आहे. मित्रमंडळींसोबत खेळण्या बागडण्यच्या दिवसांमध्ये थेट देशाच्या राजकीय वर्तुळाकडे ओढ असणारा हा मुलगा आहे गुरमीत गोयत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'एएनआय' या वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार गुरमीतने आतापर्यंत विविध राजकीय व्यक्तिमत्वांची मुलाखत घेतली आहे. ज्यामध्ये दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, जननायक जनता पार्टीचे नेते दुश्यंत चौटाला आणि दिग्वीजय चौटाला यांचा समावेश आहे. 


समाजात आपली अशी वेगळी ओळख प्रस्थापित करावी असं आपल्या आजोबांचं स्वप्न असल्याचं खुद्द गुरमीतनेच वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं. आजोबांचं हे स्वप्न साकार होत असल्याचं पाहायला ते आज आपल्यात नाही, याची गुरमीतला खंत आहे. आतापर्यंत त्याने जवळपास शंभरहून अधिक राजकीय व्यक्तिमत्वांची मुलाखत घेतली आहे. यंदाच्याच वर्षी जानेवारी महिन्यापासून त्याने स्वत:च त्या मुलाखतींचा व्हिडिओही करण्याचीही सुरुवात केली आहे. 



करिअरच्या वाटा निवडण्याच्या वयात फार आधीपासूनच गुरमीतने त्याचं लक्ष्य निर्धारित केलं आहे. किंबहुना त्या दिशेने त्याची वाटचालही सुरु आहे. भविष्यात पत्रकारितेच्या क्षेत्रात नाव कमवण्याचा त्याचा मानस आहे. ज्यानंतर गुरमीत निवडणुकीच्या रिंगणातही सक्रिय होऊ इच्छितो. मुख्य म्हणजे कोणत्याही पक्षाकडून निवडणूक लढण्याचा त्याचा मनसुबा नाही. तर, एक स्वतंत्र उमेदवार म्हणून तो या रिंगणात पुढे येऊ इच्छितो. त्याच्या याच इच्छाशक्तीची अनेकांनी दादही दिली आहे. 



एकिकडे देशाच्या राजकारणाविषयी तरुणाईच्या संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत असतानाच दुसरीकडे देशात तरुणाईच्याच वर्तुळात राजकारणासाठी तयार होणारं पोषक वातावरण पाहता राजकारणाला नवी झळाळी मिळणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.