Lockdown : मोदी सरकारचा निर्णय; मुर्तीकारांना मोठा दिलासा
काय आहे निर्णय?
मुंबई : देशात सर्वत्र कोरोना व्हायरसचं सावट आहे. कोरोना व्हायरसचा वाढता फैलाव पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात लॉकडाऊनची घोषणा केली होता. पाहता पाहता हा लॉकडाऊन चौथ्या टप्प्यात पोहोचला आहे. याचा परिणाम देशातील अर्थव्यवस्थेवर झालाच असून छोट्या उद्योगांना देखील लॉकडाऊनचा मोठा फटका बसला आहे. अशात मोदी सरकारने गणेश मुर्तीकारांना दिलासा मिळेल असा निर्णय घेतला आहे.
सरकारने प्लास्टर ऑफ पॅरिसपासून साकारण्यात आलेल्या मुर्तींवरून एका वर्षासाठी निर्बंध हटवले आहेत. केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. ते म्हणाले, 'प्लास्टर ऑफ पॅरिसपासून साकारण्यात आलेल्या मुर्तींवरून १ वर्षासाठी निर्बंध हटवण्यात येत आहेत. यंदाच्या वर्षी ज्यांच्या मुर्त्या तयार आहेत, त्यांचं नुकसान होणार नाही.'
प्लास्टर ऑफ पॅरिसपासून साकारण्यात आलेल्या मुर्त्यांमुळे पर्यावरणाला हानी पोहोचते. त्यामुळे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्लास्टर ऑफ पॅरिस, प्लास्टिक किंवा थर्माकोलच्या बनलेल्या मूर्तींवर बंदी घातली. परंतु सरकारकडून घेण्यात आलेल्या निर्णयामुळे मुर्तीकारांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण आहे.