पीएमसी बँकेच्या ७८ टक्के खातेधारकांना सर्व पैसे काढण्याची मुभा - निर्मला सितारमण
पीएमसी बँक खातेधारकांना त्यांच्या खात्यातले सर्व पैसे काढायची मुभा देण्यात आली आहे.
नवी दिल्ली : पीएमसी बँक खातेदारांपैकी जवळपास ७८ टक्के खातेधारकांना त्यांच्या खात्यातले सर्व पैसे काढायची मुभा देण्यात आली असल्याची माहिती, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी लोकसभेत दिली. ताब्यात घेतलेल्या प्रमोटर्सच्या मालमत्ता आरबीआयला दिल्या जातील. त्या मालमत्तांच्या लिलावातून आलेले पैसे खातेधारकांना दिले जाणार असल्याचेही त्या म्हणाल्या. दरम्यान, पैसे काढण्यास बंदी असल्याने अनेकांना अनेक गोष्टींचा सामना करावा लागला होता. आपले पैसे बँकेत अडकल्याचे समजाताच अनेकांना धक्का बसला होता. काहींना धक्का सहन न झाल्याने बँक खातेधारकांचा मृत्यू झाला होता. तर काहींना शाळा, महाविद्यालयाचे शुल्कही भरता आले नव्हते. तर काहींनी दागिणे विकून आपला घर खर्च चालवला होता. पैसे परत मिळण्यासाठी बँक खातेधारकांनी आंदोलनही केले होते. मुंबईत केंद्रीय अर्थमंत्री सितारमण आल्या होत्या त्यावेळी निदर्शनेही केली होती. त्यावेळी त्यांनी आश्वासन दिले होते.
पीएमसी बँक घोटाळ्यानंतर नवनवी माहिती पुढे आली होती. कर्जांसाठी २१ हजार बनावट खाती तयार केल्याची बाब पुढे आली होती. पंजाब आणि महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह (पीएमसी) बँकेने घेतलेली कर्जे लपवण्यासाठी २१,००० हून अधिक बनावट खाती वापरली आहेत, अशी माहिती पोलिस अधिका-यांनी दाखल केलेल्या तक्रारीत उघडकीस आली आहे.
आर्थिक गुन्हे शाखेकडे दाखल करण्यात आलेल्या तक्रारीत असे म्हटले आहे की बँकेच्या व्यवस्थापनावर असे निष्पन्न झाले आहे की त्यांची मालमत्ता लपविली जात नाही आणि कर्ज वितरित केले गेले ज्यामुळे कमीतकमी ४,३५५ कोटी रुपयांचे नुकसान झाले . तक्रारीनुसार, एकच रियल्टी फर्म आणि त्याच्या ग्रुप कंपन्या ४४ कर्जांचे लाभार्थी होते. या तक्रारीत बँकेचे अध्यक्ष वरम सिंग आणि त्याचे व्यवस्थापकीय संचालक जॉय थॉमस यांच्यासह अन्य बँक अधिकाऱ्यांची नावे आहेत आणि त्यांच्यावर विश्वास, खोटेपणा आणि नोंदी खोटी केल्याचा गुन्हेगारी उल्लंघन केल्याचा आरोप आहे.
पीएमसी बँक घोटाळा प्रकरणात मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने रणजीत सिंग यांना अटक केली आहे. रणजीत सिंग पीएमसी बँकेचे माजी संचालक आहेत तसेच माजी भाजप आमदार तारा सिंग यांचे पुत्र आहेत. ४,३५५ कोटी रुपयांच्या पीएमसी बँक घोटाळा प्रकरणात मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने दोन ऑडीटर्सना अटक केली होती.
पीएमसी बँकेत घोटाळा झाला तेव्हा जयेश संघानी आणि केतन लकडावाला स्टॅट्युटरी ऑडिटर होते. या घोटाळयात बँकेचे बडे अधिकारी गुंतले आहेत. बँकेत झालेल्या अनियमितता झाकण्यामध्ये जयेश आणि केतन या दोघांनी महत्वाची भूमिका बजावल्याचा संशय आहे.