पाटणा : मध्य प्रदेशमधील भोपाळ लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह हिच्या नथुराम गोडसे वक्तव्यावर बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. या व्यक्तव्याचे समर्थन कधीही करता येणार नाही, असे म्हटले आहे. नथुराम गोडसेला देशभक्त संबोधून वादात सापडलेल्या साध्वी प्रज्ञासिंहवरून नितीशकुमार यांनी भाजपला टोकले आहे. साध्वी प्रज्ञाचे वक्तव्य निषेधार्ह आहे. त्याचे समर्थन होऊच शकत नाही. साध्वीवर काय कारवाई करावी हा भाजपचा अंतर्गत प्रश्न असे ते म्हणालेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पटना येथे मतदान केल्यानंतर मतदान केंद्रातून बाहेर पडल्यावर नितीशकुमार यांनी मीडियाशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले. साध्वी प्रज्ञासिंहच्या वक्तव्याचा निषेधच आहे. साध्वी प्रज्ञासिंहने नथुराम गोडसे हा देशभक्त होता, असे विधान केले होते. त्यावरुन मोठा वाद निर्माण झाला. व्यक्तिगत मत असल्याचे सांगत भाजपने सारवासारव केली होती. याप्रकरणी चौफेर टीका झाल्यानंतर भाजपने साध्वीला नोटीस बजावली होती. त्यानंतर साध्वीने माफी मागितली.



दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साध्वीला कधीही माफ केले जाणार नाही, असे सांगून तिचे वक्तव्य चुकीचे असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहे. तिच्यावर कारवाई होईल, असेही त्यांनी यावेळी सूचीत केले. त्यामुळे आता बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे भाजप आपल्या मित्र पक्षासाठी साध्वीवर काय कारवाई करणार, याकडे लक्ष लागले आहे.