लग्नानंतर सासरी पोहचण्याआधीच नवरीचा मृत्यू; ट्रॅक्टर चालकाने घेतला पती पत्नीचा जीव
Bihar Accident : नालंदा येथे लग्नानंतर घरी परतणाऱ्या वधू-वराचा रस्ते अपघातात मृत्यू झाला. गिरियाक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हसनपूर गावात हा अपघात झाला. या घटनेनंतर दोन्ही कुटुंबांवर शोककळा पसरली आहे.
Shocking News : बिहारच्या (Bihar News) नालंदामध्ये भीषण रस्ते अपघाताने (Accident) एका नवख्या जोडप्याचा जीव घेतला. एका जीवघेण्या रस्ते अपघाने नुकताच सुरु झालेला संसार कायमचा संपला आहे. आयुष्यभरासाठी साथ देण्याची शपथ घेतल्यानंतर नवदाम्पत्याने एकत्र जीव सोडला. बिहार शरीफमधील गिरियाक पोलीस स्टेशन हद्दीतील पुरैनी गावाजवळ अवैध वाळू भरलेल्या एका ट्रॅक्टरने वधू-वराला घेऊन जाणाऱ्या कारला जोरदार धडक दिली. यात नुकतेच लग्नबंधनात अडकलेले पती पत्नी जागीच ठार झाले. या घटनेत वराचा मेहुणा गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर व्हीआयएम पावापुरी येथे उपचार सुरू आहेत.
लग्नानंतर अवघ्या काही तासांतच वधू-वराचा एकत्र मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. क्षणार्धात दोन कुटुंबांच्या आनंदाचे रूपांतर दुःखात झाले. नवरदेव आपल्या पत्नीला घेऊन घरी जात होता. तितक्यात भरधाव ट्रॅक्टरने त्यांच्या कारला जोरदार धडक दिली. गाडी रस्त्यावरुन खाली गेली आणि वधू-वर जागीच ठार झाले. या अपघातात वराचा मेहुणा गंभीर जखमी झाला. पोलिसांनी या प्रकरणई गुन्हा दाखल करून ट्रॅक्टरसह फरार चालकाचा शोध सुरू केला आहे.
नवादा जिल्ह्यातून शुक्रवारी वऱ्हाड गिर्याक येथे आले होते. लग्न आटोपून शनिवारी दुपारी वधू वरासह कारने सासरी जात होती. यादरम्यान हसनपूर गावाजवळ अवैध वाळूने भरलेल्या ट्रॅक्टरने कारला धडक दिल्याने वधू-वर जागीच ठार झाले. तर वधूचा भाऊ या अपघातात गंभीर जखमी झाला आहे. या घटनेनंतर दोन्ही कुटुंबातील मृतांच्या नातेवाईकांनी रडून आक्रोश केला आहे.
नेमकं काय झालं?
शुक्रवारी गिरियाकच्या सतुआ गावातील कारू चौधरी यांची मुलगी पुष्पा कुमारी (20) हिचा विवाह नवाडा येथील महाराणा गावातील रहिवासी श्याम कुमार (27) याच्याशी झाला होता. शनिवारी दुपारी पुष्पाला निरोप देण्यात आला. इनोव्हा कारमधून श्याम आपली नववधू पुष्पा आणि मेहुण्यासह महाराणा गावाकडे निघाला होता. दुपारी 3 वाजण्याच्या दरम्यान त्यांची कार हसनपूर गावाजवळ आली. त्यावेळी भरधाव वेगात असलेल्या वाळूने भरलेल्या ट्रॅक्टरने कारला जोरदार धडक दिली. यामुळे कार रस्त्यावरून खाली उतरली. हा अपघात इतका भीषण होता की श्याम आणि पुष्पा यांचा जागीच मृत्यू झाला. तर श्यामचा मेहुणा आणि गाडीचा चालक गंभीर जखमी झाला.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून श्याम आणि पुष्पाचा मृतदेह रुग्णालयात पाठवले. तर गंभीर जखमी मेव्हण्याला उपचारासाठी विम्स येथे दाखल केले. कारला धडक दिल्यानंतर आरोपी चालक ट्रॅक्टरसह पळून गेला. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
दरम्यान,गावात दररोज मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उत्खनन होत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. यामध्ये संबंधित पोलीस कर्मचारी देखील सहभागी असल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला आहे. मृतदेहाचे शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. गुन्हा दाखल करून फरार ट्रॅक्टर ताब्यात घेण्याचे काम पोलीस करत असल्याचे त्यांनी सांगितले.