भाजप मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित मंचावरच दोन नेते भिडलेत
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत, भाजपचे दोन ज्येष्ठ नेते मंचावरच एकमेकांना भिडलेत. यावेळी जोरदार राडा पाहायला मिळाला.
अलवर : राजस्थान भाजपामध्ये सर्वकाही चांगले चाललेले नाही, याचे चित्र पुढे आले आहे. अलवरमधील एका कार्यक्रमादरम्यान पक्षातील अंतर्गत वाद उघड झाला. मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्या उपस्थितीत, भाजपचे दोन ज्येष्ठ नेते रोहित शर्मा आणि देवी सिंह शेखावत यांच्यात जोरदार राडा पाहायला मिळाला. एकमेकांना धक्काबुक्की केली. मुख्यमंत्री यांच्या सुरक्षेतील सुरक्षा कर्मचाऱ्यानी शेखावत यांना मंचावरुन खाली आणले. दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर जोरदार आरोप-प्रत्यारोप केलेत. त्यावेळी एकच गोंधळ उडाला.
गौरव यात्रेचा भाग म्हणून मुख्यमंत्री वसुंधरा राजे अलवर येथे आल्या होत्या. जेव्हा राजे भाषण देत होत्या त्यावेळी शर्मा आणि शेखावत यांच्यात मोठा वाद निर्माण झाला. मंचावरच जोरदार राडा झाल्याने मुख्यमंत्री यांनी सुरक्षा रक्षकांना सांगून शेखावत यांना मंच सोडण्यास सांगितले. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी शेखावत यांना मंचवरून खाली आणले. त्यावेळी शेखावत यांनी याला विरोध केला.
अलवर यूआयटीचे अध्यक्ष देवी सिंह शेखावत
देवी सिंह शेखावत हे अलवर यूआयटी (सिटी डेव्हलपमेंट ट्रस्ट) चे अध्यक्ष आहेत. अलीकडेच त्यांना सरकारच्यावतीने नियुक्त करण्यात आले आहे. तर दुसरीकडे, रोहित शर्मा हे माजी परिवहन मंत्री आणि बनसुर आंतर-राज्य जल वितरण समितीचे अध्यक्ष आहेत.