नवी दिल्ली : बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी रविवारी भाजप आणि पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका केली. सोबतच त्यांनी आगामी लोकसभा निवडणूक वेळेच्या आधीच घेतल्या जाणार असल्याचं भाकीत केलं आहे. भाजपमध्ये निराशा आहे त्यामुळे कार्यकाळ संपण्याआधीच ते लोकसभा निवडणूक लढवतील असं त्यांनी म्हटलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मायावती यांनी म्हटलं की, 'भाजप आणि पीएम मोदी विकासाचा मुद्दा सोडून संप्रदाय आणि जातीयवादी गोष्टी स्वीकारत आहेत. हिंदू-मुस्लीम, स्मशान-कब्रस्तान आणि फेक न्यूजला सरकारकडून  संरक्षण दिलं जात आहे.'


बीएसपी प्रमुखांनी पुढे म्हटलं की, 'कर्नाटकमध्ये साम-दाम-दंड-भेदसह सर्व गोष्टी हाताळल्यानंतर ही ते सरकार स्थापन करु शकले नाही. भाजपचं नेतृत्व या पराभवामुळे निराश आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणूक वेळेच्या आधीच घेतल्या जातील. जम्मू-काश्मीरमध्ये महबूबा मुफ्ती यांचं सरकार पाडून यासाठी भूमिका तयार केली जात आहे.'


पंतप्रधान मोदी यांनी आझमगड आणि मिर्जापूरमध्ये दिलेल्या भाषणाला भ्रामक असल्याचं सांगत मायावती यांनी भाजप आता संप्रदाय आणि जातीच्या मुद्द्यावर निवडणूक लढवणार असल्याचं म्हटलं आहे. 


'आगामी मान्सून सत्रात पंतप्रधान मोदींना अविश्वास ठरावाचा सामना करायचा आहे. पण भाजप मागच्या वेळी प्रमाणे यंदा ही प्रस्ताव सादर करु देणार नाहीत. भाजपने लोकसभा आणि राज्यसभेला जनहित, जनकल्याण आणि देशहितापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करत आहे आणि हे निंदनीय आहे.'