BJP MLA Saves 3 From Drowning: बुडणाऱ्या तरुणांना वाचवण्यासाठी भाजपा आमदाराची समुद्रात उडी; तिघांना वाचवले, एकाचा मृत्यू
BJP MLA Saves 3 youths From Drowning: समुद्रात बुडत असलेल्या तरुणांना वाचवण्यासाठी धडपड सुरु असतानाच या ठिकाणी आलेल्या भाजपा आमदाराला घडलेल्या घटनेची माहिती मिळाली. यानंतर त्यांनी पुढचा मागचा विचार न करता समुद्रात उडी घेतली.
BJP MLA Saves Youths From Drowning: गुजरातमधील भारतीय जनता पार्टीचे आमदार रजुला येथील आमदार हिरा सोलंकी (BJP MLA Hira Solanki) यांनी बुधवारी 3 तरुणांचा जीव वाचवला. पटवा गावातील समुद्रकिनाऱ्याजवळ हा संपूर्ण प्रकार घडला. येथील समुद्रामध्ये 4 मित्र उतरले होते. अचानक समुद्राला भरती आल्याने हे चौघेही बुडू लागले. त्यावेळी झालेला आरडाओरड ऐकून जवळ उपस्थित असलेल्या भाजपा आमदाराने समुद्राकडे धाव घेतली. स्वत: खोल पाण्यात उडी मारुन या आमदाराने 3 तरुणांना वाचवलं. मात्र दुर्देवाने यामध्ये एका तरुणाचा मृत्यू झाला.
नेमकं घडलं काय?
कल्पेश सियाल, विनय गुजारीया, निकुल गुजरीया आणि जीवन गुजरीया हे चौघे भटकंतीसाठी आले होते. बुधवारी सायंकाळी या चौघांनी समुद्रात पोहण्यासाठी जाण्याचं ठरवलं. त्यानुसार ते समुद्रात उतरले. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने आणि मोठ्या लाटांमुळे हे चौघेही खोल समुद्रात खेचले गेले. या चौघांनाही आरडाओरड करुन समुद्रकिनाऱ्यावर असलेल्या लोकांकडे मदत मागण्यास सुरुवात केली. या चौघांचे आवाज ऐकून समुद्रकिनाऱ्यावरील लोकांनी मदत करण्यासाठी धडपड सुरु केली. स्थानिकांनीही समुद्रकिनाऱ्यावर धाव घेतली. या तरुणांना मदत करण्यासाठी स्थानिक लोकांनी हलचाल सुरु केली. पोलिसांनाही यासंदर्भातील माहिती कळवण्यात आली. मात्र पोलीस येईपर्यंत वाट पाहण्याआधीच या समुद्रात अडकलेल्या तरुणांना वाचवण्यासाठी स्थानिकांकडून नियोजन सुरु झालं.
...अन् भाजपा आमदाराने समुद्रात मारली उडी
समुद्रकिनाऱ्यावर हा संपूर्ण प्रकार सुरु असतानाच भाजपाचे स्थानिक आमदार सोलंकीही तिथेच होते. काही कामानिमित्त समुद्रकिनाऱ्यावर आलेल्या सोलंकी यांना 4 तरुण बुडत असल्याची माहिती मिळाली. त्यांनी तातडीने समुद्रकिनाऱ्याकडे धाव घेतली. त्यांनी या तरुणांना वाचवण्यासाठी सुरु असलेली खटपट पाहिली तेव्हा स्वत: उत्तम पोहता येत असल्याने त्यांनी त्यांनी पुढचा मागचा कोणताही विचार न करता थेट समुद्रात उडी मारली. सोलंकींबरोबर इतरही काही तरुणांनी समुद्रात उड्या मारल्या. अन्य लोक बोटीने या तरुणांच्या दिशेने जाण्याची तयारी करु लागले. दरम्यान या तरुणांना वाचवण्यासाठी गेलेल्यांनी त्यांना पकडलं आणि बुडण्यापासून वाचवलं. त्याचदरम्यान बोटही तिथे आल्याने या बुडणाऱ्या तरुणांना बोटीवर खेचून घेण्यात आलं. तीन तरुणांना वाचवण्यात आल्यानंतर चौथ्याचा शोध सुरु केला.
चौथ्या तरुणाचा दोन तास सुरु होता शोध
जवळजवळ 2 तासांहून अधिक काळ या चौथ्या मुलाचा शोध सुरु होता. हा शोध घेतानाही आमदार सोलंकी तिथेच उपस्थित होते. मात्र त्याचा मृतदेह नंतर आढळून आला. मरण पावलेल्या मुलाचं नाव जीवन गुजरीया असं आहे. स्वत: आमदाराने पुढाकार घेत या तरुणांचा जीव वाचवल्याने भाजपा आमदारावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.