मुंबई : नुकताच गुजरातमधील अहमदाबादमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोड शो झाला. यावेळी पंतप्रधानांना एका वेगळ्याच शैलीत पाहिले गेले. त्यांनी या रोड शोमध्ये एक भगव्या रंगाची टोपी घातली होती. जी सर्वांच्या आकर्षणाचे केंद्र बिंदू बनली. भाजपमधील कोणत्याच नेत्याने ही टोपी आधी घातली नव्हती. त्यात पंतप्रधानांनी ही पक्षाची टोपी घातली. ज्यामुळे या टोपीची चर्चा सुरू झाली आहे. या भगव्या टोपीवर भाजपचं चिन्ह कमळ देखील आहे. तसेच यावर हिंदी आणि गुजरातीमध्ये भाजप लिहिलं गेलं आहे. चला तर या बहुचर्चीत टोपीबद्दल जाणून घेऊ या माहिती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही खास भगवी टोपी सुरतमधील एका कापड गिरणीत बनवली गेली आहे. भारतीय जनता पक्षासाठी भगव्या टोप्या बनवणारे सूरतमधील कापड गिरणी मालक संजय सरावगी यांनी सांगितले की, गुजरात प्रदेश भाजप अध्यक्ष सीआर पाटील यांनी त्यांनी बनवलेली ही खास टोपी पंतप्रधान मोदींना दिली होती.


गुजरातची आर्थिक राजधानी असलेल्या सुरतला कापड शहर देखील म्हटले जाते. येथे बनवलेल्या साड्या आणि इतर प्रकारचे कपडे देशात आणि जगभरात पाठवले जातात. सुरतमधील कापड व्यापारी संजय सरोगी हे देखील साडी उत्पादक आणि लक्ष्मीपती साडी ग्रुपचे मालक आहेत.


संजय सरोगी यांच्या कापड गिरणीत साडीसोबतच केशरी टोपी बनवण्याचे काम सध्या सुरू आहे. भाजपने केलेल्या भगव्या टोप्या बनवण्यासाठी गिरणी कामगार रात्रंदिवस झटत आहेत.


टोपी बनवणाऱ्या लक्ष्मीपती ग्रुपचे चेअरमन संजय सरोगी यांनी सांगितले की, अशा प्रकारे टोपी बनवण्याची कल्पना त्यांना गुजरात प्रदेश भाजप अध्यक्ष सीआर पाटील यांनी दिली, ज्यामुळे त्यांनी ही टोपी बनवली. त्यानंतर या टोपीला प्रदेश भाजप अध्यक्ष सीआर पाटील यांनीच पंतप्रधान मोदींपर्यंत पोहोचवली.


अहमदाबाद रोड शो दरम्यान पंतप्रधानांनी त्यांच्या कारखान्यात बनवलेली टोपी घातली, ही त्यांच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.


भाजपची ही भगवी टोपी बनवणारे संजय सरोगी यांनी सांगितले की, ही टोपी तयार करण्यासाठी खास कापडाचा वापर करण्यात आला आहे. रसायनांचा वापर करून ते कापड भगव्या रंगाचे बनवले आहे. या टोपीचे वैशिष्ट्य म्हणजे ही टोपी घातल्यानंतर डोक्याला घाम येणार नाही आणि ती सहजपणे परिधान करता येते. भगव्या टोपीवर गुजराती आणि हिंदी भाषेत 'भाजप' लिहिलेले आहे. तसेच त्यावर कमळाचे फूलही छापण्यात आले आहे.


गुजरातमध्ये गुजराती भाषेच्या टोप्या घालण्यात येणार आहेत, तर देशभरातील भाजप खासदारांसाठी हिंदी भाषेच्या टोप्या बनवण्यात आल्या आहेत. गुजरात प्रदेश भाजपचे अध्यक्ष सीआर पाटील यांनी देशातील भाजप खासदारांना या टोप्या दिल्या आहेत.


विशेष म्हणजे अहमदाबादमधील रोड शो दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर नेत्यांनी टोप्या परिधान केल्या होत्या. त्यानंतर भाजपचे कार्यकर्ते पक्षाच्या कार्यक्रमांची ही टोपी घालताना दिसत आहेत. आता या वर्षी गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकाही होणार आहेत, त्यामुळे निवडणूक प्रचारादरम्यान भाजप या टोप्या जोरदारपणे वापरण्याची शक्यता आहे.