नोटांच्या आकारात सातत्याने बदल, उच्च न्यायालयाने आरबीआयला फटकारले
या मुद्द्यावरून मुंबई उच्च न्यायालयाने रिझर्व बॅंक ऑफ इंडीयाला फटकारले आहे.
नवी दिल्ली : तुम्हाला जर नोटा आणि नाणी ओळखण्यात अडचणी येत असतील तर हे केवळ तुमच्यासोबत नाही तर खूप जणांसोबत होत आहे. मोठ्या संख्येने लोक यामुळे त्रस्त आहेत. या मुद्द्यावरून मुंबई उच्च न्यायालयाने रिझर्व बॅंक ऑफ इंडीयाला फटकारले आहे. चलनातील नोटा आणि नाण्यांचे फिचर्स आणि आकार सारखे का बदलले जातात ? याबद्दल न्यायालयाने आरबीआयला विचारले होते. आरबीआयतर्फे उत्तर देण्यासाठी वेळ मागण्यात आला. यामुळे न्यायालयाने आरबीआयला फटकारले आहे.
नोटांचे आकार सारखे बदलण्यामागे आरबीआयचा काय नाईलाज आहे ? असा प्रश्न मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश प्रदीप नंदराजोग आणि न्यायाधीश भारती डोंगरे यांच्या पीठाने आरबीआयला विचारला. नोट बदलण्यामागचा इतिहास आणि कारणांचा शोध घेण्यासाठी वेळ मागितला. त्यावेळी उत्तर द्यायला तुम्हाला आकड्यांची गरज नाही. तुम्ही किती नोट छापल्या हे आम्ही तुम्हाला विचारल नसल्याचे मुख्य न्यायाधीश नंदराजोग यांनी म्हटले. यासंदर्भात नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाईंडने यासंदर्भात याचिका दाखल केली आहे.
दोन आठवड्यांची मुदत
भविष्यात अशाप्रकारे नोटांचे आकार बदलले जाणार नाहीत असे तरी कमीत कमी सांगा. हे जर तुम्ही सांगितलात तर ही समस्या जवळजवळ संपेल असे मुख्य न्यायाधिशांनी म्हटले. याआधी उच्च न्यायालयाने आरबीआयला १ ऑगस्ट पर्यंत उत्तर देण्याचा वेळ दिला.
आरबीआय आपल्या अधिकारांचा अशाप्रकारे वापर करु शकत नाही ज्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागेल असे मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधिशांनी म्हटले. एक रुपयांची नोट कायदेशीर असताना ती प्रक्रियेच्या बाहेर का गेली ? असा प्रश्न देखील सामान्य नागरिक उपस्थित करु शकतात असेही त्यांनी म्हटले.