मुंबई : भारतात कॅफे संस्कृती रुजण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली ती म्हणजे CCD म्हणजेच 'कॅफे कॉफी डे'ने. सध्याच्या घडीला सीसीडी चर्चेचा विषय ठरत आहे ते म्हणजे संस्थापक आणि या कॉफी आऊटलेटची मालकी असणाऱ्या व्ही.जी. सिद्धार्थ यांच्या अचानकच बेपत्ता होण्यामुळे. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एस.एम. कृष्णा यांचे जावई आणि सीसीडीच्या यशातील मुख्य भागीदार म्हणून पाहंल जाणाऱ्या सिद्धार्थ यांच्याविषयी कळताच अनेकांना धक्का बसला. सोमवारी, नेत्रावती नदीच्या पुलावर कारमधून उतरतेवेळी कारचालकानेच त्यांना शेवटचं पाहिलं होतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

२३ वर्षांपूर्वी केली सीसीडीची सुरुवात 


जवळपास २३ वर्षांपूर्वी १९९६ मध्ये सीसीडीच्या पहिल्या आऊटलेटची सुरुवात झाली. बंगळुरूच्या ब्रिगेड रोड येथे हा शुभारंभ झाला होता. सुरुवातीला हे कॉफी शॉप इंटरनेट कॅफेच्या साथीने सुरु करण्य़ात आलं. त्यावेळी तरुणाईने या कॅफेला प्रचंड चांगला प्रतिसाद दिला. हळूहळू ही संकल्पना आणखी रुजू लागली आणि सीसीडीने कॉफीच्या मूळ व्यवसायासहच हा पसारा आणखी वाढवण्याचा निर्णय घेतला. 


देशातील सर्वाधिक मोठी 'कॉफी चेन'


सुरुवातीच्या काळात ठराविक भागांमध्ये कॉफी शॉप सुरु करणारं सीसीडी आजच्या घडीला देशातील सर्वात मोठी कॉफी चेन म्हणून ओळखलं जातं. आज फक्त भारतातच नव्हे, तर परदेशातही सीसीडी पाहायला मिळतात. आतापर्यंत संपूर्ण देशात २४७ शहरांमध्ये १ हजार ७५८ सीसीडी आहेत. 


सिद्धार्थ यांच्या कुटुंबाकडे कॉफीचे मळे होते. जेथे महागड्या कॉफीचं उत्पादन घेतलं जात होतं. ज्यामुळेच त्यांना सीसीडीची कल्पना सुचली. ९० च्या दशकात जी कॉफी दक्षिण भारत आणि पंचतारांकित हॉटेलांमध्ये प्रचलित होती, तिला सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा निर्णय सिद्धार्थ यांनी घेतला होता. 


वाचा : 'लढलो खरा... पण आज हार मानतोय', सीसीडीच्या मालकांचं भावनिक पत्र


एका अटीवर वडिलांनी दिले ५ लाख रुपये


कुटुंबात कॉफीविषयी असणारी जाण पाहता त्यांनी या व्यवसायाची सुरुवात केली. सुरुवातीला त्यांनी वडिलांकडून पाच लाख रुपये घेतले होते. शिवाय सिद्धार्थ यांना एका अटीवर हे पैसे देण्यात आले होते. या साऱ्यामध्ये अपयशी ठरल्यास पुन्हा कुटुंबाच्याच व्यवसायात यायचं, अशी ती अट होती. पण, सिद्धार्थ यांनी मागे वळून पाहिलं नाहीय आजच्या घडीला जवळपास ४ हजार कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल  करणारी कंपनी म्हणून सीसीडीकडे पाहिलं जातं.