उरले फक्त 2 दिवस... Chandrayaan 3 चंद्रापासून नेमकं किती किलोमीटर दूर? इस्रोची नवी Update
Chandrayaan 3 : पृथ्वीवरून सुरु झालेला चांद्रयान मोहिमेचा आणि चांद्रयान 3 चा प्रवास अतिशय महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचला आहे. काय आहे तो टप्पा? पाहा....
Chandrayaan 3 Latest Update : भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात ISRO कडून चांद्रयान 3 संदर्भातील नवनवीन माहिती वेळोवेळी देण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर पडणाऱ्या चांद्रयानानं अखेर रविवारी चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला. इस्रोकडून चांद्रयानाची एक कक्षा कमी करण्यात आली आणि त्या क्षणी चंद्राचा पहिला फोटो या चांद्रयानानं पृथ्वीवर पाठवला.
प्रवासातला एक एक टप्पा ओलांडत चांद्रयान सध्या अंतिम ध्येयाच्या दिशेनं आगेकूच करत आहे. त्याच्या प्रत्येक हालचालीवर इस्रो नजर ठेवत असून, त्यासंबंधीचीच नवी अपडेट नुकतीच शेअर करण्यात आली आहे. ही माहिती यासाठी महत्त्वाची कारण, त्यातून चंद्रापासून चांद्रयान 3 नेमकं किती दूर आहे याबाबतची आकडेवारी स्पष्ट करण्यात आली आहे.
इस्रोनं ट्विट करत दिलेल्या माहितीनुसार सध्या चांद्रयान अंडाकृती कक्षेत चंद्राला परिक्रमा घालत असून त्याचं चंद्रापासूनचं किमान अंतर 170 किमी आणि कमाल अंतर 4310 किमी इतकं आहे. दोन दिवसांनंतर म्हणजेच 9 ऑगस्ट रोजी चांद्रयानाची कक्षा इस्रो आणखी कमी करेल. ज्यामुळं ते चंद्राच्या आणखी नजीक पोहोचणार आहे. त्यामुळं चंद्राच्या जवळ पोहोचण्यासाठी चांद्रयानाला अवघे दोन दिवस उरले आहेत.
हेसुद्धा वाचा : प्रत्यक्षात असा आहे चंद्र! चांद्रयान 3 ने चंद्राच्या कक्षेत प्रवेश करताना टिपलेला पहिला फोटो ISRO ने केला शेअर
चंद्राच्या पृष्ठावर पोहोचेपर्यंत आणखी तीन वेळा चांद्रयानाच्या कक्षा कमी करण्यात येणार असून, 17 ऑगस्टपर्यंत ही प्रक्रिया सुरु असेल. ज्यानंतर लँडिंग प्रक्रिया सुरु होणार असून, लँडर आणि रोवर प्रोपल्शन मॉड्युलपासून वेगळं होईल. 14 जुलै रोजी लाँच झाल्या क्षणापासून साधारण पाच मोठ्या टप्प्यांमध्ये चांद्रयान पृथ्वीपासून आणखी दूर जाण्याची प्रक्रिया निर्धारित असून, आता 23 ऑगस्टला त्याच्या लँडिंगवरच सर्वांच्या नजरा असणार आहेत.
चांद्रयानानं पाठवला पहिला संदेश...
5 ऑगस्टला सायंकाळी 7 वाजून 15 मिनिटांच्या सुमारास चांद्रयान चंद्राच्या कक्षेत गेलं. गुरुत्वाकर्षणाचा अंदाज यावा यासाठी चांद्रयानाचा वेग कमी करण्यात आला. पुढे चांद्रयानानं या मोहिमेची माहिती दिल्याचा संदर्भ इस्रोनं सोशल मीडियावर शेअर केला. 'मी चांद्रयान आहे, मला चंद्राचं गुरुत्त्वाकर्षण जाणवतंय', हाच तो संदेश असल्याचं सांगण्यात येत आहे.