पबजी गेमवरून आईचा ओरडा, मुलाची गळफास घेऊन आत्महत्या
तरुणांमध्ये दिवसेंदिवस मोबाईल गेम खेळण्याचे वेड वाढत चालल्याचे पाहायला मिळत आहे.
नवी दिल्ली : तरुणांमध्ये दिवसेंदिवस मोबाईल गेम खेळण्याचे वेड वाढत चालल्याचे पाहायला मिळत आहे. गेम्सच्या व्यसनामुळे तरुण कोणत्याही थराला जाऊ शकतात हे अनेकदा सिद्ध झाले आहे. या गेम्समुळे अनेकांच्या आरोग्यावर परिणाम होतोय. तसेच मोबाईल गेम जीवावर बेतल्याच्या घटनाही समोर येत आहेत. अशीच एक घटना हैदराबाद येथे समोर आली आहे. पबजी गेम खेळायला आईने विरोध केल्याने मुलाने आत्महत्या केल्याचा दुर्देवी प्रकार घडला आहे.
हैदराबादमध्ये दहावी इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला मोबाईलवरील पबजी खेळाचे व्यसन जडले होते. 16 वर्षाचा मुलगा आपल्या आई वडीलांच्या मोबाईलवर सतत पब्जी खेळ खेळायचा. त्याला या गेम्सची सवय लागल्याचे पोलिसांनी सांगितले. या विद्यार्थ्याची दहावीची परीक्षा सुरू होती. त्यामुळे अभ्यास करावा यासाठी सोमवारी त्याला आई ओरडली. आईचे बोलणे त्याने मनाला लावून घेतले. आणि बंद खोलीत स्वत:ला कोंडून घेतले. त्यानंतर पंख्याला लटकून त्याने स्वत:चा जीव गमावला.
बराच वेळ दरवाजा न उघडल्याने घरच्यांमध्ये घबराहट पसरली. त्यानंतर खोलीचा दरवाजा तोडण्यात आला. त्यावेळी हा मुलगा पंख्याला लटकलेला दिसला. मुलाला रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मुलाच्या वडीलांना यासंदर्भात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.