`माझा संयम सुटतोय, तुम्ही...`; CJI चंद्रचूड कोर्टरुममध्ये अचानक का आणि कोणावर संतापले?
CJI Chandrachud Losing His Patience: सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी त्यांच्यासमोर आलेल्या एका वकिलाचं म्हणणं ऐकून चांगलेच संतापल्याचं चित्र पाहायला मिळालं. चंद्रचूड यांनी उघडपणे आपली नाराजी व्यक्तही करुन दाखवली.
CJI Chandrachud Losing His Patience: देशाचे सरन्यायाधीश डी. व्हाय. चंद्रचूड यांनी मंगळवारी त्यांच्याकडे तक्रार घेऊन आलेल्या एका वकिलाला चांगलेच फैलावर घेतले. सर्वोच्च न्यायालयामधील एका न्यायाधीशाची तक्रार करण्यासाठी सरन्यायाधीशांकडे आलेल्या या वकिलाला न्यायालयाचा काही आदेश पटला नसेल तर रिव्ह्यू पेटीशन दाखल करा, असं सांगितलं. वकील अशोक पांड्ये हे अचानक सरन्यायाधीशांच्या कोर्टरुममध्ये घुसले. न्यायाधीशांनी आपला वकिलीचा परावाना रद्द करण्याची धमकी दिल्याची पांड्ये यांची तक्रार होती.
अनेक दशकांचा अनुभव
मात्र अशाप्रकारे थेट कोर्टरुममध्ये प्रवेश करणाऱ्या वकिलावर सरन्यायाधीश चंद्रचूड चांगलेच संतापले. चंद्रचूड यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायालयाअंतर्गत तक्रार करण्याची पद्धत नसल्याचं संबंधित वकिलाला सांगितलं. "तुम्हाला न्यायालयाचा एखादा आदेश पटला नसेल तर तुमच्याकडे रिव्ह्यू पेटीशनचा पर्याय उपलब्ध आहे. या न्यायालयामधील प्रत्येक न्यायाधीश फार अनुभवी आहे. त्यांना अनेक दशकांचा अनुभव असून वकिलांबद्दलचही हेच म्हणता येईल," असं सरन्यायाधिशांनी सांगितलं. पांड्ये यांनी सर्वोच्च न्यायालयाने याचिका (पीआयएल) दाखल केल्याप्रकरणी आपल्याला दंड ठोठावल्याचंही सांगितलं.
धमकी दिल्याचा दावा
"मी केवळ केलेला दंड रद्द करण्यात यावा यासाठी याचिका केली होती. त्यावर न्यायाधिशांनी मला कोर्टरुममधून बाहेर जाण्यास सांगितलं आणि त्यांनी मला माझा परवानाही रद्द होईल अशी धमकी दिली," असं पांड्ये यांनी खंडपिठाला सांगितलं. हे ऐकून सरन्यायाधीशांनी पांड्ये यांना आपला संयम संपत चलला आहे, असं सांगत सूचक इशारा दिला.
नक्की वाचा >> वकील होण्यासाठीचे पासिंग मार्क कमी करा; थेट सरन्यायाधीशांसमोर याचिका! चंद्रचूड म्हणाले, 'जरा अभ्यास..'
माझा संयम संपत चालला आहे
"बराच वेळ झाला मी तुमचं ऐकून घेत आहे. मात्र आता माझा संयम सुटत चालला आहे. मी समजू शकतो की इतर न्यायालयांमध्ये काय होतं ते. मात्र तुम्ही कायदेशीर मार्गाचा अवलंब करा," असं सरन्यायाधीशांनी सूचवलं. त्यानंतर पांड्ये यांनी अर्जदाराला कोर्टाकडून दंड ठोठावण्यात आला तर पीआयएल व्यवस्था कशी काम करते हे सांगण्याचा प्रयत्न केला.
कधीतरी शाब्दिक देवाण-घेवाण होते
सरन्यायाधीशांनी कधीतरी कोर्टामध्ये प्रकरणावर सुनावणीदरम्यान गंभीर होऊन न्यायाधीश आणि समोरच्या पक्षांमध्ये शाब्दिक देवाण-घेवाण होऊ शकते. मात्र सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश हे अनुभवी असतात आणि अशा परिस्थिती कशी हाताळावी हे त्यांना ठाऊक असतं, असं सरन्यायाधीशांनी सांगितलं.
दोन वेगवेगळ्या न्यायालयांनी फटकारलं
सोमवारी पांड्ये यांना दोन वेगवेगळ्या न्यायालयांनी फटकारलं होतं. पांड्ये यांना फटकारणाऱ्या खंडपीठांमध्ये न्यायमूर्ती अभय ओक यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाचाही समावेश होता. न्या. ओक यांच्या खंडपीठाने पांड्ये यांनी 50 हजार रुपयांचा दंड न भरल्यासंदर्भात फटकारलं. काहीही मुद्दा नसलेली याचिका दाखल केल्याप्रकरणी पांड्ये यांना दोन आठवड्यांमध्ये दंडाची 50 हजार रुपये रक्कम भरण्याचे आदेश देण्यात आले. खंडपीठाने पांड्ये यांनी ही रक्कम भरण्यासाठी अधिक वेळ देण्याची मागणीही फेटाळली.