नवी दिल्ली : राजधानी दिल्लीच्या आम आदमी पार्टी सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी दिल्लीकरांना आणखी एक भेट दिली आहे. दिल्ली सरकारने (Delhi Governmnent) आज जाहीर केले की १६ डिसेंबरपासून नि:शुल्क वायफाय (Free WiFi)  सेवा मिळणार आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल  (Arvind Kejriwal) यांनी सांगितले, पहिल्या टप्प्यात २२ लाख लोक एकाच वेळी विनामूल्य वायफाय वापरू शकतील. या टप्प्यात ११ हजार हॉटस्पॉट बसविण्यात येतील आणि ६ महिन्यांत हे काम पूर्ण होईल. ज्यामध्ये पहिल्या १०० हॉट स्पॉट्सचे उद्घाटन १६ डिसेंबर रोजी होईल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पाणी, वीज कनेक्शननंतर मोफत वायफाय देण्याची घोषणा केली होती. १६ डिसेंबरपासून दिल्लीतील लोकांना नि:शुल्क वायफाय मिळणार आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांनी फ्री वायफाय देण्याचे आश्वासन दिले होते. मोफत वायफाय उपलब्ध करून देण्याबरोबरच दिल्ली सरकार आपल्या निवडणूक जाहीरनाम्यातील शेवटचे वचन देखील पूर्ण करेल. अशाप्रकारे दिल्ली सरकार आपले सर्व निवडणूक आश्वासने पूर्ण करणारे पहिले सरकार बनेल, आसा दावा केजरीवाल यांनी केला आहे.



संपूर्ण शहरात ११ हजार हॉटस्पॉट्स बसविण्यात येत आहेत, त्यापैकी चार हजार हॉट स्पॉट बसस्टँडवर आणि आरडब्ल्यूएमध्ये सात हजार हॉट स्पॉट्स बाजारात बसविण्यात येतील, मुख्यमंत्री म्हणाले. ११ हजार स्पॉट्सवर वायफाय बसविण्यात आल्यामुळे विशेषतः विद्यार्थ्यांना फायदा होईल. आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रातही फायदा होईल अशी अपेक्षा केजरीवाल यांनी व्यक्त केली आहे.


दिल्लीतील लोकांना नि: शुल्क वायफाय आमच्या जाहीरनाम्याचे महत्त्वपूर्ण वचन होते. आम्हाला असे वाटते की डिजिटल युगात किमान इंटरनेट कनेक्टिव्हिटी आणि किमान डेटा वापर ही कोणत्याही माणसाची मूलभूत गरज बनली आहे. ज्या प्रकारे आम्ही २०० युनिट वीज आणि २० हजार लिटर पाणी मोफत केले आहे. आम्ही मूलभूत इंटरनेट वापर देखील मोफत करणार आहोत. याची अंमलबजावणी झाल्यानंतर आमच्या जाहीरनाम्यातील हे अंतिम वचन देखील पूर्ण झाले.जाहीरनाम्यातील सर्व आश्वासने पूर्ण करणारे पहिले सरकार असेल असे केजरीवाल म्हणालेत.