काँग्रेसच्या `या` तीन मराठी नेत्यांची प्रभारीपदी नियुक्ती
राहुल गांधी यांच्या विश्वासू सहकाऱ्यांपैकी एक असणाऱ्या राजीव सातव यांच्याकडे गुजरातचे प्रभारीपद देण्यात आले आहे.
नवी दिल्ली: काही दिवसांपूर्वीच पार पडलेल्या कार्यकारिणीच्या वादळी बैठकीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी काँग्रेसकडून संघटनात्मक बदल जाहीर करण्यात आले. यामध्ये महाराष्ट्रातील तीन नेत्यांवर प्रभारी पदाची धुरा सोपवण्यात आली आहे. राहुल गांधी यांच्या विश्वासू सहकाऱ्यांपैकी एक असणाऱ्या राजीव सातव यांच्याकडे गुजरातचे प्रभारीपद देण्यात आले आहे. तर रजनी पाटील आणि मुकूल वासनिक यांच्यावर अनुक्रमे जम्मू-काश्मीर आणि मध्य प्रदेशच्या प्रभारीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर प्रियांका गांधी यांच्याकडे संपूर्ण उत्तर प्रदेशची जबाबदारी देण्यात आली आहे.
काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल, मल्लिकार्जुन खरगे यांना महाराष्ट्राच्या प्रभारी पदावरूनही हटवले
याशिवाय, काँग्रेस पक्षात अनेक महत्त्वाचे अंतर्गत बदल पाहायला मिळत आहेत. सोनिया गांधी यांना पत्र लिहण्यात आणि नंतरही जाहीरपणे नेतृत्त्वाविषयी शंका उपस्थित करणाऱ्या गुलाम नबी आझाद यांना महासचिव पदावरून डच्चू देण्यात आला आहे. तर मल्लिकार्जुन खरगे यांनाही महासचिवपदासह महाराष्ट्राच्या प्रभारीपदावरूनही हटवण्यात आले आहे.
तसे काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांना मदत करण्यासाठी सहा जणांची समिती स्थापन करण्यात आली आहे. यामध्ये ए के एन्टोनी, अहमद पटेल, अंबिका सोनी, के.सी. वेणुगोपाल, मुकूल वासनिक आणि रणदीप सुरजेवाला यांचा समावेश आहे.