रायपूर: अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीत काँग्रेस पक्ष हाच सर्वात मोठा अडथळा असल्याची घणाघाती टीका उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली. ते शनिवारी छत्तीसगढमध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचारसभेत बोलत होते. यावेळी योगींनी राम मंदिराच्या मुद्द्यावरून काँग्रेसवर निशाणा साधला. त्यांनी म्हटले की, अयोध्येत श्रीरामाचे मंदिर बांधण्यात सर्वात मोठा कोणता अडथळा असेल तर तो म्हणजे काँग्रेस पक्ष. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अयोध्येत राम मंदिर होऊ नये, असे काँग्रेसला वाटते. त्यामुळेच ते राम मंदिराच्या उभारणीत अडथळे आणत आहेत. ज्या काँग्रेसला श्रीराम आपलासा वाटत नाही, ते आपल्या काय कामाचे असूच शकत नाहीत, असे योगी आदित्यनाथ यांनी म्हटले. 


छत्तीसगढ विधानसभा निवडणुकीचा पहिल्या टप्प्यातील प्रचाराचा आज शेवटचा दिवस होता. येत्या १२ तारखेला राज्यातील १८ मतदारसंघांमध्ये मतदान पार पडेल. 


तत्पूर्वी आज प्रचाराच्या शेवट्या दिवशी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा मैदानात उतरले होते. यावेळी राहुल यांनी परप्रांतीय आणि रोजगाराच्या मुद्द्यावरून जनतेला साद घालण्याचा प्रयत्न केला. 


तर अमित शहा यांनी काँग्रेस कधीही छत्तीसगढचं भलं करू शकणार नाही, अशी टीका केली. ज्या पक्षाला नक्षलवाद्यांमध्ये क्रांतिकारक दिसतात. नक्षलवाद हा क्रांतीचं माध्यम वाटतो, तो पक्ष कधीच छत्तीसगडचं भलं करू शकत नाही, असे त्यांनी सांगितले.