Congress President Election : तब्बल 22 वर्षांनी झालेल्या काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत देशभरात 96 टक्के मतदान झालं. देशातील 9 हजार 500 काँग्रेस सदस्यांनी या मतदानात भाग घेतला. महाराष्ट्रात प्रदेश काँग्रेसच्या 561 पैकी 542 मतदारांनी आपलं मत नोंदवलं. काँग्रेस अध्यक्षपदासाठी मल्लिकार्जून खरगे (Mallikarjun Kharge) विरूद्ध शशी थरूर (Shashi Tharoor) असा थेट सामना आहे. येत्या 19 ऑक्टोबरला मतमोजणी होणार असून, यानिमित्तानं तब्बल 24 वर्षांनी गांधी कुटुंबाबाहेरील व्यक्ती काँग्रेस अध्यक्ष होणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काँग्रेस अध्यक्षांचा इतिहास
काँग्रेसच्या 137 वर्षांच्या इतिहासात अध्यक्षपदासाठी आतापर्यंत सहावेळा निवडणूक झाली. 1885 मध्ये स्थापना झालेल्या काँग्रेसचं अध्यक्षपद आतापर्यंत 88 जणांनी भूषवलंय. 1924 मध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी काँग्रेसचे अध्यक्ष होते. त्यानंतर कृपलानी, रेड्डी, कामराज, नरसिंहराव, केसरी असे अनेक बिगर गांधी कुटुंबातील अध्यक्ष झाले. सोनिया गांधींनी 1998 मध्ये काँग्रेस अध्यक्षपदाची सूत्रं हाती घेतली.  त्यानंतर 2000 साली झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत त्यांनी जितेंद्र प्रसाद यांचा पराभव केला. त्यामुळे गेली 24 वर्षं काँग्रेस अध्यक्षपदाची धुरा सोनिया (Sonia Gandhi) आणि राहुल गांधींकडे (Rahul Gandhi) होती.


सध्या देशभरात काँग्रेसची पीछेहाट झालीय. राहुल गांधींचं नेतृत्व सातत्यानं अपयशी ठरत असल्यानं खांदेपालट करण्याचं धोरण काँग्रेसनं स्वीकारलंय. २०२४ सालच्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा काँग्रेसला अच्छे दिन आणण्याची जबाबदारी नव्या पक्षाध्यक्षांवर असणार आहे.