मुंबई : पाच राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व निर्बंध पाळून मतदान व्हावं यासाठी निवडणूक आयोगाने तयारी केली आहे. मात्र अशा परिस्थितीत कोरोनाबाधित व्यक्ती मतदान करू शकणार नाही का? तर यावर निवडणूक आयोगाने उपाय शोधला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शनिवारी निवडणूक आयोगाने (EC) उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपूर, गोवा आणि पंजाबमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या. मात्र यावेळी कोरोनाबाधितांना अजिबात काळजी करण्याची गरज नाही. कारण अशा लोकांसाठी पोस्टल बॅलेटची सुविधा उपलब्ध होणार आहे. 


निवडणूक आयोगाची संपूर्ण तयारी


कोरोनाची वाढती रूग्णसंख्या पाहता आयोगाने म्हटलंय की, "कोविडपासून सुरक्षित निवडणूका व्हावं हे आमचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे कोरोनाबाबत सर्व तयारी करण्यात आली आहे."


मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्र यांनी सांगितलं की, "कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक योजना काळजीपूर्वक तयार करण्यात आल्या आहेत. यावेळी, कोरोनाची लागण झाल्यानंतर, क्वारंटाईन केलेल्या लोकांना देखील मतदान करता येणार आहे. अशा व्यक्तींसाठी पोस्टल बॅलेटची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलीये."


कशी असेल प्रक्रिया


यामध्ये निवडणूक आयोगाची टीम कोरोना बाधित किंवा संशयित व्यक्तीच्या घरी जाऊन त्याला तिथे मतदान करण्यास सांगणार आहे. मुख्य म्हणजे या संपूर्ण प्रक्रियेची व्हिडिओग्राफी देखील केली जाईल. विधानसभा निवडणुकीदरम्यान कोरोनाचा संसर्ग असलेली व्यक्ती तसंच 80 वर्षांवरील ज्येष्ठ आणि दिव्यांग व्यक्तींना ही सुविधा देण्यात आलीये.


त्याचप्रमाणे सर्व मतदान केंद्रांवर मास्क आणि सॅनिटायझर्स उपलब्ध असणार आहेत. जेणेकरून मतदान कोरोपासून सुरक्षित राहू शकेल, असं निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आलंय.