गेल्या 24 तासात आतापर्यंतच्या सर्वाधिक कोरोना केसेस, इतक्या जणांच्या मृत्यू
भारतात कोरोना व्हायरसमुळे परिस्थिती आणखी गंभीर
मुंबई : भारतात कोरोना व्हायरसमुळे (Covid19) परिस्थिती आणखी गंभीर होत आहे. गेल्या चार दिवसांत तिसऱ्यांदा एक लाखांहून अधिक प्रकरणे नोंदवली गेली आहेत. गेल्या 24 तासांत देशभरात कोविड 19 ची 1.26 लाख प्रकरणे नोंदवली गेली. यापूर्वी बुधवारी ( 7 एप्रिल) देशभरात 1.15 लाख नवीन प्रकरणे नोंदवली गेली.
24 तासांत 1,26,789 लोकांना लागण
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, गेल्या 24 तासात 1 लाख 26 हजार 789 लोकांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. तर या काळात 685 लोकांचा मृत्यू झाला.
यानंतर भारतात कोरोनाची लागण होणाऱ्यांची संख्या 1 कोटी 29 लाख 28 हजार 574 वर गेली आहे. 1 लाख 66 हजार 862 लोकांना आपला जीव गमवावा लागला.
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत देशात 59 हजार 258 लोक कोरोनातून बरे झाले आहेत. त्यानंतर बरे झालेल्या लोकांची संख्या वाढून 1 कोटी 18 लाख 51 हजार 393 इतकी झाली. तथापि, गेल्या 24 तासांत 66 हजार 846 एक्टीव्ह रुग्णांमध्ये वाढ झाली. आता भारतात कोरोना व्हायरसच्या 9,10,319 केसेस आहेत.
देशभरात 9.01 कोटी व्हॅक्सीन
आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आतापर्यंत देशभरात 9 कोटी 1 लाख 98 हजार 673 लस देण्यात आल्या. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (ICMR) नुसार आतापर्यंत (7 एप्रिल) देशभरात 25 कोटी 26 लाख 77 हजार 379 सॅंपल टेस्ट घेण्यात आल्या. ज्यामध्ये 12 लाख 37 हजार 781 चाचण्या घेण्यात आल्या.