Corona : अटी-शर्तींसह दारू मिळणार, या राज्य सरकारचा निर्णय
कोरोना व्हायरसचा संसर्ग वाढत असल्यामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आलं आहे.
तिरुवनतंपूरम : कोरोना व्हायरसचा संसर्ग वाढत असल्यामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. २१ दिवसांच्या या कालावधीमध्ये जनतेला फक्त जीवनावश्यक वस्तूच मिळणार आहेत. पण केरळ सकारने मात्र अटी आणि शर्तींसह दारू देण्याचा निर्णय घेतला आहे. डॉक्टरांचं प्रिसक्रिप्शन असणाऱ्यांना दारू द्या, असे आदेश केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी महसूल विभागाला दिले आहेत, असं वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने दिलं आहे.
लॉकडाऊनच्या काळामध्ये दारूची दुकानं बंद आहेत. दारू मिळत नसल्यामुळे आत्महत्या केल्याची काही प्रकरणं केरळमध्ये समोर आली, त्यानंतर केरळ सरकारने हा निर्णय घेतला आहे.
दारू मिळत नसल्यामुळे शनिवारी थिसूर जिल्ह्याच्या कोडूनगलूरमध्ये एका तरुणाने नदीत उडी मारून जीव दिला. तर कयमकूलम भागात सलूनमध्ये काम करणाऱ्या ३८ वर्षांच्या एका व्यक्तीने दारू मिळत नसल्यामुळे शेव्हिंग लोशनचं सेवन केलं. या व्यक्तीला रुग्णालयात दाखल केलं असलं तरी त्याचा मृत्यू झाला.
दारूचं व्यसन असणाऱ्यांवर फुकटात उपचार करा, तसंच त्यांना व्यसन मुक्ती केंद्रात दाखल करुन घ्या, असंही केरळच्या सरकारने महसूल विभागाला सांगितलं आहे.
अचानक दारू बंद झाल्यामुळे सामाजिक समस्या निर्माण होऊ शकतात, त्यामुळे दारूची ऑनलाईन विक्री करण्याचाही विचार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले आहेत.