भारतात लॉकडाऊन एखाद्या लसीप्रमाणे परिणामकारक ठरला- केंद्रीय आरोग्यमंत्री
आता पर्यंत देशात १ लाख ३१ हजार ८६८ लोकांना कोरोनाची लागण झाली आहे.
नवी मुंबई : देशव्यापी लॉकडाऊनचा निर्णय योग्यवेळी घेण्यात आल्यामुळे भारतात कोरोना व्हायरसचा प्रकोप मोठ्या प्रमामणात कमी करण्यास मदत झाली असल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी दिली. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार आता पर्यंत देशात १ लाख ३१ हजार ८६८ लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. रविवारी वृत्तसंस्था एएनआयशी बोलताना त्यांना हा महत्त्वाचा दावा केला.
देशातील लॉकडाऊनला 'सामर्थ्यशाली सामाजिक लस' म्हणून संबोधित करत त्यांनी व्हिडिओद्वारे केलेल्या भाषणात ही माहिती दिली. देशात वेळेत लॉकडाऊन घोषित केल्यामुळे रुग्णांचे प्रमाण दुप्पटीने कमी झाले आहे. लॉकडाऊनपूर्वी कोरोना रुग्णांची संख्या ३.४ दिवसांनी दुप्पट होत होती आणि तिच संख्या आता १३ दिवसांनी दुप्पट होत आहे.
भारतात लॉकडाऊन एखाद्या लसीप्रमाणे परिणामकारक ठरला असं देखील आरोग्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन यावेळी म्हणाले. भारतात परिस्थिती हाताबाहेर जाण्यापूर्वी लॉकडाऊनचा निर्णय घेतला. हाच महत्तवाचा निर्णय घेण्यासाठी प्रगत राष्ट्रांनी मात्र फार उशीर केल्याचा उल्लेख देखील त्यांनी केला.
आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार आता पर्यंत देशात १ लाख ३१ हजार ८६८ लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी ३ हजार ८६७ रुग्णांनी आपले प्राण गमावले आहेत. तर दिलासादायक बाब म्हणजे ५४ हजार ४४० रुग्ण कोरोनाच्या विळख्यातून बाहेर पडले असून ७३ हजार ५६० रुग्णांवर उपचार सुरू आहेत