शिमला: गेल्या काही दिवसांमध्ये कोरोनाच्या दहशतीमुळे मुंबई आणि दिल्लीसारख्या शहरांतील अनेक लोकांनी आपापल्या गावांकडे स्थलांतर केल्याचे दिसून आले होते. लॉकडाऊनमुळे वाहने उपलब्ध नसतानाही अनेकांनी शेकडो मैलांची पायपीट करत आपले गाव गाठले होते. शहरांमध्ये उपजीविकेचे कोणतेही साधन न उरल्यामुळे लोकांना नाईलाजाने हा निर्णय घ्यावा लागला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Corona : शेपटीवाल्या प्राण्यांची मुंबईत भरली सभा.....

यानंतर आता शहरातील प्राणीही हाच मार्ग अवलंबताना दिसत आहेत. हिमाचल प्रदेशच्या अनेक शहरी भागातील माकडे ग्रामीण भाग आणि जंगलांकडे स्थलांतर करत असल्याचे दिसून आले आहे. लॉकडाऊनमुळे शहरे बंद पडली आहेत. त्यामुळे या माकडांना नेहमीप्रमाणे खाणे उपलब्ध होत नाही. ही उपासमार टाळण्यासाठी माकडांना आता पुन्हा जंगल शिल्लक असलेल्या ग्रामीण भागाकडे मोर्चा वळवला आहे. 



मात्र, माकडांच्या या स्थलांतरामुळे आता ग्रामीण भागात नवीन समस्या उभी राहण्याची शक्यता आहे. ग्रामीण भागात शिरलेल्या माकडांच्या टोळ्या शेतातील पिके आणि भाजीपाल्याची मोठ्याप्रमाणावर नासधुस करत आहेत. राज्यातील जवळपास ९२ तालुक्यांमध्ये गेल्या तीन वर्षांपासून माकडांना नुकसानकारक प्राणी म्हणून घोषित करण्यात आले आहे. मात्र, आता संपूर्ण राज्यासाठी हा नियम लागू करावा. माकडांना अन्न पुरवण्यासाठी सरकारने विशेष केंद्रांची स्थापना करावी, अशी मागणी हिमाचल प्रदेशातील किसान सभेच्या अध्यक्षांनी केली आहे.