नवी दिल्ली: देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येने बुधावारी २० हजारांचा टप्पा ओलांडला. आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, बुधवारी देशभरात कोरोनाचे १४८६ नवे रुग्ण आढळून आले. यापूर्वी रविवारी आणि मंगळवारी कोरोनाच्या नव्या रुग्णांची संख्या अनुक्रमे १५७७ आणि १५१० इतकी नोंदवण्यात आली होती.  गेल्या काही दिवसांत देशातील कोरोनाच्या रुग्णांचे प्रमाण वाढत असले तरी यापूर्वीच्या आकडेवारीची तुलना केल्यास भारताने परिस्थितीवर बरेच नियंत्रण मिळवल्याचे जाणकारांकडून सांगितले जात आहे. 

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशात कोरोनाच्या रुग्णांची संख्या १० हजारावरून २० हजारापर्यंच जाण्यासाठी आठ दिवसांचा अवधी लागला. २६ मार्चला केंद्र सरकारने देश लॉकडाऊन केला होता. गेल्या काही दिवसांतील आकडेवारीवर नजर टाकल्यास याचा बराच फायदा झाल्याचे स्पष्ट होते. लॉकडाऊनपूर्वी कोरोना रुग्णांच्या संख्येचा गुणाकार पाहायला मिळत होता. मार्चच्या सुरुवातीला देशातील कोरोना रुग्णांची संख्या तीनवरून १०० पर्यंत जाण्यासाठी दोन आठवड्यांचा अवधी लागला. यानंतरच्या दोन आठवड्यात हा आकडा हजारापर्यंत पोहोचला होता. त्याच्यानंतर दोन आठवड्यांपेक्षा थोड्या अधिक कालावधीत देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या थेट १० हजारांवर जाऊन पोहोचली होती. 


'काश्मीरला मोठा धोका; पाकिस्तानकडून पाठवले जातायत कोरोनाबाधित घुसखोर'

या वेगाने आकडेमोड करायची झाल्यास एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत देशातील लाखभर लोकांना कोरोनाची लागण व्हायला पाहिजे होती. मात्र, लॉकडाऊन आणि इतर उपाययोजनांमुळे एप्रिल अखेरीस देशातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा २५ ते ३० हजारापर्यंतच मर्यादित राहील. त्यामुळे तुर्तास तरी देशात कोरोना नियंत्रणात असल्याचे चित्र आहे. 

देशातील कोरोनाचे एक तृतीयांश रुग्ण हे एकट्या महाराष्ट्रात आहेत. ३० एप्रिल ते १५ मे हा कालावधी महाराष्ट्राच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचा इशारा भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेकडून (IMCR) देण्यात आला आहे. या काळात महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ पाहायला मिळू शकते, असा अंदाज आहे.