श्रीनगर: भारताच्या लष्करी सामर्थ्यामुळे काश्मीर मिळवण्याचे मनसुबे फोल ठरलेल्या पाकिस्तानकडून कोरोनाच्या संकटकाळात एक घातक डाव खेळला जात आहे. गेल्या अनेक वर्षांपासून काश्मीरमध्ये पाकिस्तानने दहशतवाद पसरवला. मात्र, आता पाकिस्तानने काश्मीरमध्ये कोरोनाचा फैलाव करण्याची योजना आखली आहे. त्यासाठी पाकिस्तानकडून काश्मीरमध्ये कोरोनाबाधित रुग्णांना पाठवले जात आहे.
जम्मू काश्मीरचे पोलीस महासंचालक दिलबाग सिंह यांनी याविषयी प्रतिक्रिया देताना म्हटले की, आमच्या कानावर अशा गोष्टी आल्या आहेत. आतापर्यंत पाकिस्तान भारतात दहशतवाद पसरवत होता. परंतु, आता पाकिस्तानकडून कोरोना पसरवण्यासाठी काश्मीरमध्ये COVID-19 पॉझिटिव्ह रुग्ण पाठवले जात आहेत. ही चिंतेची गोष्ट आहे. आम्ही या सगळ्यावर लक्ष ठेवून असल्याचे दिलबाग सिंह यांनी सांगितले.
#WATCH "What we have heard is that till now, Pakistan used to export terrorists, now they will export coronavirus positive patients to infect people in Kashmir. It is a matter of concern," says, Jammu and Kashmir DGP Dilbag Singh pic.twitter.com/lx90yErJKW
— ANI (@ANI) April 22, 2020
कोरोनासारख्या संकटाच्या काळातही पाकिस्तान भारतावर दोषारोप करण्यात धन्यता मानत आहे. सीमारेषेवरही पाकिस्तानकडून वारंवार शस्ससंधीचे उल्लंघन केले जात आहे. काही दिवसांपूर्वीच भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले होते. यानंतरही सोपोरमध्ये दहशतवाद्यांनी CRPFच्या तुकडीवर हल्ला केला होता. यामध्ये तीन भारतीय जवान शहीद झाले होते. पाकिस्तानमध्ये आतापर्यंत ९७४९ लोकांना कोरोनाची बाधा झाली असून यामध्ये २०९ लोकांचा मृत्यू झाला आहे. पाकच्या पंजाब प्रांतात कोरोनाचे ४३२८, सिंध प्रांतात ३०५३, खैबर पख्तुनवामध्ये १,३४५, बलुचिस्तानमध्ये ४९५, गिलगिट बाल्टिस्तानमध्ये २८४, इस्लामाबादमध्ये १९४ आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये कोरोनाचे ५१ रुग्ण आहेत.