गावात घुसले मगरीचे पिल्लू आणि मग....
छत्तीसगडमधील कोटमीसोनार गावात एका घटनेने खळबळ माजली.
छत्तीसगड : छत्तीसगडमधील कोटमीसोनार गावात एका घटनेने खळबळ माजली. ३ फूट लांब मगरीचे पिल्लू गावातील गल्ल्यांमध्ये पळताना दिसले आणि एकच खळबळ उडाली. कसेबसे गावकऱ्यांनी त्या मगरीच्या पिल्लाला पकडले आणि वनविभागाला याची माहिती दिली. हाती आलेल्या माहितीनुसार, मगरीच्या पिल्लाने गावातील एका व्यक्तीवर हल्ला करुन त्याला जखमी केले.
काय झाले नेमके?
एका गावकऱ्याने सांगितले की, सकाळी काही कामानिमित्त घराबाहेर जात असताना रस्त्यावर एक मगरीचे पिल्लू पळताना पाहिले आणि घाबरगुंडी उडाली. ते पिल्लू सुमारे ३ फूट लांब होते आणि रस्ता चुकल्याने सैरावैरा पळत होते. ते पाहुन मी लगेचच आजूबाजूच्या लोकांना आवाज दिला. त्यानंतर जमलेल्या सर्व लोकांनी याची सूचना वनविभागाला देण्याचा निर्णय घेतला.
पकडणारा जखमी
दुसऱ्या गावकऱ्याने सांगितले की, वनविभागाला माहिती दिल्यानंतरही ते वेळेवर घटनास्थळी पोहचले नाहीत. त्याचबरोबर मगरीच्या त्या पिल्लाने एकाला जखमी केल्यावर आम्ही त्याला पकडून तलावात सोडण्याचा निर्णय घेतला. मात्र पकडणाऱ्या मुलाला मगरीच्या पिल्लाने जखमी केले. जवळच्या एका तलावातून हे पिल्लू गावात घुसल्याची शक्यता गावकऱ्यांनी वर्तवली.