मोदी पुन्हा सत्तेत आल्याने दाऊद घाबरला; घेतली ISIच्या अधिकाऱ्यांची भेट
मोदींच्या पुन्हा सत्तेत येण्याने अनेक समीकरणे बदलली आहेत.
नवी दिल्ली: नरेंद्र मोदी पुन्हा एकदा सत्तेत आल्यामुळे कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याची पाचावर धारण बसली आहे. त्यामुळे दाऊदने पाकिस्तानच्या ISI या गुप्तचर संस्थेच्या अधिकाऱ्यांची भेट घेतल्याचीही माहिती समोर आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, २०१४ साली भाजपची सत्ता आल्यानंतर सरकारने दाऊदभोवतीचा फास आवळायला सुरुवात केली होती. दाऊदची संपत्ती जप्त करण्याबरोबरच त्याच्या अनेक साथीदारांवर सरकारने कारवाईचा बडगा उगारला होता. या सगळ्यामुळे पाकिस्तानात लपून बसलेल्या दाऊदची प्रचंड कोंडी झाल्याचे सांगितले जाते. त्यामुळे दाऊद यंदाच्या निवडणुकीत सत्तापालट होईल, याकडे डोळे लावून बसला होता.
मात्र, यंदाच्या निवडणुकीत मोदी सरकार पुन्हा एकदा बहुमताने सत्तेत आले. त्यामुळे दाऊदला मोठा धक्का बसला. या निकालानंतर दाऊदने तात्काळ 'आयएसआय'च्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन याविषयी चिंता व्यक्त केली. या बैठकीत त्यांच्यात अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. दाऊदने नरेंद्र मोदी यांची वाढती लोकप्रियता आणि भारताची अमेरिका व इस्रायलशी वाढत असलेली जवळीक याविषयी चिंता व्यक्त केली.
विरोधकांनी वर्षभर आत्मचिंतनासाठी चारधाम यात्रेस निघून जावे; शिवसेनेचा खोचक सल्ला
या सगळ्याविषयी बोलताना माजी पोलीस अधिकारी पी.के. जैन यांनी सांगितले की, मोदींच्या पुन्हा सत्तेत येण्याने अनेक समीकरणे बदलली आहेत. त्यामुळे पाकिस्तान आणि दाऊद इब्राहिमवरील दबाव आणखी वाढणार आहे. कदाचित दाऊदला पाकिस्तानमधून पकडून आणण्यासाठी भारताकडून एखादी गुप्त मोहीम आखली जाऊ शकते. यासाठी अमेरिकेची सीआयए आणि इस्रायलची मोसाद या गुप्तहेर संघटना भारताची मदत करतील. त्यामुळे दाऊद प्रचंड घाबरल्याचे पी.के. जैन यांनी सांगितले.