FAKE INFORMATION ! `ज्या लोकांनी कोरोना लस घेतली त्यांचा 2 वर्षात मृत्यू नक्की` ही माहिती खोटी
सोशल मीडियावर एक व्हायरल पोस्ट फिरत आहे. ज्यामुळे पुन्हा लोकांच्या मनात भीती चे वातावरण निर्माण झाले आहे.
मुंबई : संपूर्ण जग जेव्हा कोरोनाच्या चपाट्यात अडकले, तेव्हा जवळजवळ सर्वच देशात लॉकडाऊन सारखे कडक निर्बंध लावले गेले. त्यानंतर मास्क आणि सामाजिक अंतर ही ठेवले गेले. लोकांच्या मनात भीतीचे वातावरण तयार झाले होते. त्यानंतर अनेक शास्त्रज्ञांच्या प्रयत्नानंतर कोव्हिड-19 लसींचा शोध लावला गेला. त्यानंतर लोकांना दिलासा मिळाला. लस मिळाल्याने लोकांच्या मनातली भीती कमी झाली आणि प्रत्येक देशातील निर्बंध देखील शिथील होऊ लागले.
परंतु आता सोशल मीडियावर एक व्हायरल पोस्ट फिरत आहे. ज्यामुळे पुन्हा लोकांच्या मनात भीती चे वातावरण निर्माण झाले आहे. ही बातमी आहे की, कोव्हिड-19 लस घेतल्यानंतर दोन वर्षात लोकांचा मृत्यू होतो. त्याच बरोबर या बातमीला नोबेल पारितोषिक विजेते लुस मॉन्टॅग्निअर (Luc Montagnier) यांचा छोटा फोटो देखील लावला आहे. ज्यामुळे लोकांना ही बातमी खरी वाटत आहे.
ही व्हायरल बातमी वाचल्यानंतर लोकांमध्ये, विशेषत: ज्यांनी कोरोनाची लस घेतली आहे, अशा लोकांमध्ये भीतीचे वातावरण जास्त आहे. परंतु या माहितीत काहीच सत्य नाही आणि ती पूर्णपणे बनावट आणि फेक आहे. सरकारनेही ती बातमी बनावट असल्याचा दावा केला आहे.
केंद्र सरकारच्यावतीने प्रेस इन्फोर्मेशन ब्युरोने (PIB) या बातमीचे विश्लेषण केले आहे. PIB ने आपल्या अधिकृत ट्वीटर हँडलवर लिहिले की, कोव्हिड-19 या लसीबद्दल फ्रेंच नोबेल पुरस्कार विजेते असलेल्या व्यक्तीच्या नावावर हा दावा सोशल मीडियावर शेअर केला जात आहे. पंरतु पोस्टमध्ये केलेला दावा खोटा आहे.
कोव्हिड -19 ची लस पूर्णपणे सुरक्षित आहे. या प्रकारची कोणतीही अस्पष्ट आणि खोटी माहिती व्हॉट्सअॅपवर किंवा कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करू नका. या व्हायरल पोस्टमध्ये असे लिहिले गेले आहे की, ज्यांनी कोरोनाची लस घेतली आहे, त्यांची जगण्याची शक्यता नगण्य आहे. कोणत्याही कंपनची लस घेतली असली तरी मृत्यूला टाळणे अवघड आहे.
पीआयबीने याची सत्यता तपासली आहे आणि लिहिले की, कोरोनाची लस घेतल्याने लोकांचा 2 वर्षात मृत्यू होतो हा दावा बनावट आहे. लक्षात ठेवा, बनावट बातम्या व्हायरस इतकेच धोकादायक आहेत. असा विश्वास आहे की, लोकांना लस घेण्यापासून रोखण्यासाठी हा संदेश पसरवला जात आहे. म्हणूनच सरकारने लोकांना बनावट बातम्या न पसरवता लस घेण्याचे आवाहन केले आहे.