Video : स्वतःचाच गळा चिरून धावत होता तितक्यात... दिल्लीतून हादरवणारी घटना समोर
Crime News : दिल्लीतील हा सर्व धक्कादायक प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. या तरुणाने स्वतःचा गळा चिरला आणि हातात चाकू आणि पिस्तुल घेऊन रस्त्याच्या मधोमध पळू लागला.
Delhi Crime : गेल्या काही दिवसांपासून देशाची राजनाधी दिल्लीत (Delhi News) गुन्हेगारीच्या घटनांमध्ये (Crime News) मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. अशातच आता दिल्लीच्या शाहदा परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दोन दिवसांपूर्वी घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. नथू कॉलनी चौकाजवळ चाकूने स्वत:चा गळा चिरून रस्त्यावर धावणाऱ्या एका व्यक्तीने पोलीस कर्मचाऱ्याचे (Delhi Police) पिस्तूल हिसकावून गोळीबार सुरू केला होता. मात्र, काही वेळाने पोलिसांनी जमावाच्या मदतीने या माथेफिरुला ताब्यात घेतले आहे. दरम्यान हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.
दिल्लीतील नाथू कॉलनी चौकात 16 मार्च रोजी हा सर्व प्रकार घडला. रक्ताने माखलेला एक तरुण हातात चाकू आणि पिस्तुल घेऊन रस्त्याने पळत होता. दिल्ली पोलिसांना संध्याकाळी 7 वाजता कंट्रोल रूममध्ये ही माहिती देण्यात आली. त्यानंतर तात्काळ दिल्ली पोलिसांचे एक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तरुणाला समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. उलट त्याने एका पोलीस कर्मचाऱ्याला जखमी केले. त्यानंतर एका पोलीस कर्मचाऱ्याचे पिस्तूल हिसकावले आणि एक राऊंड फायर केला. यानंतर तो एका हातात चाकू आणि दुसऱ्या हातात पिस्तुल घेऊन रस्त्याने पळू लागला. यानंतर स्थानिक नागरिकांनी आणि पोलिसांनी त्याला कसेबसे पकडले. यानंतर दिल्ली पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.
दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कृष्णा शेरवाल असे या व्यक्तीचे नाव असल्याचे समोर आले आहे. बऱ्याच प्रयत्नांनंतर पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेतल्यानंतर त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल केलं आहे. तिथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत. कृष्णा शेरवाल विरुद्ध आरोपींविरुद्ध भादवि आणि आर्म्स अॅक्टच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पत्नीपासून विभक्त झाल्यानंतर शेरवाल हा नैराश्यात होता.
"16 मार्च रोजी संध्याकाळी 6:40 आणि 6:50 वाजता, मानसरोवर पार्क पोलीस स्टेशनला दोन पीसीआर कॉल आले होते. त्यामध्ये कृष्णा शेरवाल या व्यक्तीने चाकूने गळा चिरला असून त्याच्या जवळ चाकू घेऊन फिरत आहे, असे सांगण्यात आले होते. नथू कॉलनी चौकात लोकांनी आणि पोलिसांनी तरुणाला आवरण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी एका पोलीस कर्मचाऱ्याला त्याने जखमी केले. मात्र, नंतर त्याला पोलिसांनी पकडले आणि त्याच्याकडून पिस्तूल जप्त करण्यात आले," असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.