नवी दिल्ली : जम्मू-काश्मीर प्रशासनाने अमरनाथ यात्रा थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. सोबतच काश्मीरमध्ये आलेल्या सर्व पर्यटकांना काश्मीर सोडण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. काश्मीरमध्ये मोठ्या दहशतवादी हल्ल्याची शक्यता आहे. दहशतवाद्यांकडून अमरनाथ यात्रेवर हल्ला होण्याची शक्यता होती. पण ती सुरक्षा रक्षकांनी हाणून पाडली आहे. सुरक्षा रक्षकांना रस्त्यात एक स्नाईपर गन सापडल्याने ही शक्यता आणखी वाढली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सर्च ऑपरेशनदरम्यान सापडलेली स्नाईपर ही अमेरिकन बनावटीची आहे. एम-24 ही रायफल सुरक्षा रक्षकांनी ताब्यात घेतली आहे.


सीआरपीएफ, जम्मू-काश्मीर पोलीस आणि लष्कराने शुक्रवार एकत्र पत्रकार परिषद घेतली. लेफ्टिनंट जनरल केजेएस ढिल्लन यांनी म्हटलं की, 'अमरनाथ यात्रेच्या रस्त्यालगत एका गुप्त ठिकाणी एम-24 स्नाईपर रायफल दुर्बिनीसह सापडली आहे.'


प्रशासनाने काश्मीरमधील पर्यटकांना परत जाण्यास सांगितलं आहे. जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांपासून हालचाली वाढल्या आहेत. शुक्रवारी सकाळी ही बॉर्डर परिसरात तणावपूर्ण वातावरण पाहायला मिळालं.


मोठ्या प्रमाणात सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आल्यानं राज्यातच नाही तर संपूर्ण देशात चर्चा सुरु आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने 10 हजार अतिरिक्त जवान जम्मू-काश्मीरमध्ये तैनात केले आहेत. आणखी काही जवानांच्या तुकड्या पाठवण्यात येणार असल्याची देखील माहिती आहे.


जम्मू-काश्मीरमध्ये काहीतरी मोठं घडणार आहे अशी शक्यता अनेक जाणकरांनी वर्तवली आहे आहे. सरकार असा कोणता मोठा निर्णय घेणार आहे याबाबत तर येणारी वेळच सांगू शकते.