मुंबई : 'प्रकाशमय' अशा सणाला म्हणजे दिवाळीचा आजचा पहिला दिवस. धनत्रयोदशी आणि वसुबारस असे दोन्ही सण एकाच दिवशी आले आहेत. दिवाळी उत्सव चालू असताना धनत्रयोदशीस एक आगळेवेगळे स्वरुप येते. दिवाळीवर पावसाचं सावट असलं तरी सामान्यांचा उत्साह दाणगा आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे धनत्रयोदशी. हिंदू कालदर्शिकेनुसार आश्विन वद्य त्रयोदशीला धनत्रयोदशी असे म्हणतात. या दिवशी धनाची देवता लक्ष्मी आणि धनाचे भांडार कुबेर यांची पूजा केली जाते. यंदा याच दिवशी धन्वंतरी जयंती देखील आली आहे. आयुर्वेदाचे प्रवर्तन करताना धन्वंतरी रूपात विष्णूने अवतार घेतला होता, अशी आख्यायिका आहे. (हे पण वाचा - दिवाळीच्या 'या' दिवसांचं महत्त्वं माहितीये?) 


धनत्रयोदशी पूजेचे शुभ मुहूर्त 


शुभ मुहूर्त – संध्याकाळी 7.08 ते रात्री 8.14 पर्यंत


प्रदोष काल - संध्याकाळी 5.39 ते रात्री 8.14 पर्यंत


धनत्रयोदशी पूजा विधी


धनत्रयोदशीच्या दिवशी पूजा विशेष पद्धतीने केली जाते. तसेच या दिवशी उत्तर दिशेला कुबेर आणि धन्वंतरीची स्थापना करून तुपाचा दिवा लावला जातो. कुबेराला पांढऱ्या रंगाची आणि धन्वंतरीसमोर पिवळ्या रंगाची मिठाईचा नैवैद्य ठेवला जातो. "ॐ ह्रीं कुबेराय नमः" आणि "धनवंतरी स्तोत्र" जप केला जातो. घरातील सोन्या, चांदीचे दागिने आणि नाण्यांची पूजा केली जाते. घराच्या बाहेर राईच्या तेलाचा दिवा देखील लावला जातो.


यंदा धनत्रयोदशी आणि वसूबारस देखील आहे. भारतीय संस्कृतीत पशूधनाची देखील पूजा केली जाते. वसुबारसच्या दिवशी गोधनाची आणि प्राण्यांची पूजा करण्याची परंपरा आहे. गायीच्या पूजनाने सर्व देवतांपाशी आपली सेवा पोहचत असल्याचे मानले जाते. या दिवशी गायीला नैवेद्य दाखवले जाते. 


धनत्रयोदशीपासून यंदा दिवाळी सुरू झाली आहे. पाच दिवस असणारी दिवाळी यंदा फक्त तीनच दिवस आहे. धनत्रयोदशीच्या निमित्ताने आज सोन्याच्या दरात वाढ झाली आहे.